रेमेडिसिव्हीरच्या विक्रीवर आता जिल्हा पथकाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:50+5:30
रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी रूटीन वॉर्ड व आयसोलेशनसाठी महत्तम दर चार हजार, अतिदक्षता वॉर्डात व्हेंटिलेटर नसेल तर साडेसात हजार रुपये व व्हेंटिलेटर असेल तर नऊ हजार रुपये निश्चित केले आहेत. त्यात सीबीसी, युरिन रुटीन, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस आदी विविध सेवांचा समावेश आहे.

रेमेडिसिव्हीरच्या विक्रीवर आता जिल्हा पथकाचा ‘वॉच’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी रुग्णालयांकडून शासन निर्धारित दरांचे काटेकोर पालन तपासण्यासाठी स्वतंत्र पथक गठित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तसा आदेश शनिवारी निर्गमित केला.
पथकात उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार संतोष काकडे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप, औषध निरीक्षक मनीष गोतमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांचा समावेश आहे.
रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी रूटीन वॉर्ड व आयसोलेशनसाठी महत्तम दर चार हजार, अतिदक्षता वॉर्डात व्हेंटिलेटर नसेल तर साडेसात हजार रुपये व व्हेंटिलेटर असेल तर नऊ हजार रुपये निश्चित केले आहेत. त्यात सीबीसी, युरिन रुटीन, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस आदी विविध सेवांचा समावेश आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी १६ स्लाईसच्या मशीनसाठी दोन हजार रुपये, मल्टिडिटेक्टर सीटी (एम डी सीटी) १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनसाठी अडीच हजार रुपये, ६४ स्लाईसहून अधिकच्या मशीनसाठी तीन हजार रुपये दर आहे. यात सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्ज व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तात्काळ तपासणीसाठी समान दर राहतील, असे राम लंके म्हणाले.
राधानगरातील मेडिकलवर कारवाई
राधानगरातील स्नेहगुंज मेडिकल स्टोर्स यांनी सक्षम अधिकाऱ्याकडून नियमानुसार परवानगी न घेता हॉटेल श्रीपाद येथील कोविड सेंटरमधून औषधाचा साठा, विक्री केल्यामुळे औषधी व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा बेकायदेशीर कृत्यासाठी इमारतीचा वापर करू दिल्याबद्दल श्रीपाद हॉटेल येथे संचालित कोविड सेंटरविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी पथकाने बारब्दे हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर, श्रीपाद हॉटेल इमारतीतील हॉस्पिटल, सनशाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल, महेश भवन व मेडिकल स्टोर यांची तपासणी केल्याचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.
असे आहेत शासन निर्धारित दर
आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये, रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी १५० रुपये करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपिड अँटिजेन, अँटिबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. अँटिबॉडीज चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० रुपये, रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत आल्यास १५०, २०० आणि ३०० रुपये असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.