रेमेडिसिव्हीरच्या विक्रीवर जिल्हा पथकाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:31+5:302021-04-11T04:13:31+5:30

अमरावती : खासगी रुग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी रेमेडिसिव्हीर इंजेक्शनसह औषधे, ऑक्सिजन व सेवेचे दर शासनाने यापूर्वीच निश्चित केले आहेत. ...

District team's 'watch' on sale of remedicivir | रेमेडिसिव्हीरच्या विक्रीवर जिल्हा पथकाचा ‘वॉच’

रेमेडिसिव्हीरच्या विक्रीवर जिल्हा पथकाचा ‘वॉच’

अमरावती : खासगी रुग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी रेमेडिसिव्हीर इंजेक्शनसह औषधे, ऑक्सिजन व सेवेचे दर शासनाने यापूर्वीच निश्चित केले आहेत. रुग्णालयांकडून त्याचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक गठित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी निर्गमित केला.

खासगी रुग्णालयांत रेमेडिसिव्हीर इंजेक्शन, औषधे, ऑक्सिजन यांचे आकारण्यात येणार दर, रुग्णांचे बिल आदी बाबींची हे पथक वेळोवेळी तपासणी करेल तसेच रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण करेल. पथकातील सदस्यांचे मोबाईल क्रमांकही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. पथकात उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार संतोष काकडे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप, औषध निरीक्षक मनीष गोतमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांचा समावेश आहे.

शासन निर्धारित दरापेक्षा जादा दराने रुग्णांकडून आकारणी होते किंवा कसे, याची नियमित तपासणी हे पथक करणार आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी रूटीन वॉर्ड व आयसोलेशनसाठी महत्तम दर चार हजार, अतिदक्षता वॉर्डात व्हेंटिलेटर नसेल तर साडेसात हजार रुपये व व्हेंटिलेटर असेल तर नऊ हजार रुपये निश्चित केले आहेत. त्यात सीबीसी, युरिन रुटीन, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस आदी विविध सेवांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्ताला विविध प्रकारच्या तपासण्यांव्यतिरिक्त सी.टी. स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मशीनच्या क्षमता-वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी १६ स्लाईसच्या मशीनसाठी दोन हजार रुपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनसाठी अडीच हजार रुपये, ६४ स्लाईसहून अधिकच्या मशीनसाठी तीन हजार रुपये दर निश्चित केले आहेत. या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्ज व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील, उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.

बॉक्स

असे आहेत शासन निर्धारित दर

आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये, रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी १५० रुपये करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपिड अँटिजेन, अँटिबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. अँटिबॉडीज चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० रुपये, रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत आल्यास १५०, २०० आणि ३०० रुपये असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

बॉक्स

पथकाद्वारे राधानगरातील मेडिकलवर कारवाई

राधानगरातील स्नेहगुंज मेडिकल स्टोर्स यांनी सक्षम अधिकाऱ्याकडून नियमानुसार परवानगी न घेता हॉटेल श्रीपाद येथील कोविड सेंटरमधून औषधाचा साठा, विक्री केल्यामुळे औषधी व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा बेकायदेशीर कृत्यासाठी इमारतीचा वापर करू दिल्याबद्दल श्रीपाद हॉटेल येथे संचालित कोविड सेंटरविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी पथकाने बारब्दे हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर, श्रीपाद हॉटेल इमारतीतील हॉस्पिटल, सनशाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल, महेश भवन व मेडिकल स्टोर यांची तपासणी केल्याचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.

Web Title: District team's 'watch' on sale of remedicivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.