जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची कक्षाबाहेर काढली
By Admin | Updated: July 31, 2015 00:49 IST2015-07-31T00:49:10+5:302015-07-31T00:49:10+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात शारीरिक चाचणी प्रमाणपत्र नागरिकांना विहित वेळेत मिळत नसल्याने रूग्णांना मन:स्ताप सहन करावा लागतो.

जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची कक्षाबाहेर काढली
आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात शारीरिक चाचणी प्रमाणपत्र नागरिकांना विहित वेळेत मिळत नसल्याने रूग्णांना मन:स्ताप सहन करावा लागतो. या नेहमीच्याच प्रकारामुळे संप्तत झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांची खुर्ची कक्षाबाहेर काढून या प्रकाराचा निषेध केला आहे.
जिल्ह्यातील रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत दर सोमवारी आणि गुरूवारी शारीरिक चाचणी प्रमाणपत्र देण्यात येते. यासाठी मागील आठ दिवसांपासून विरूळकर नामक रूग्ण तपासणी नंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात चकरा मारत आहेत. मात्र त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबतची तक्रार विरूळकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, आणि शहराध्यक्ष आनंद आमले यांच्याकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात गेले असता या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक हे आपला पदभार कुणालाही न देता मुंबई येथे गेल्याचे कळले. मात्र त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामीण भागातील रूग्णांना ठरवून दिलेल्या दिवशी प्रमाणपत्र मिळाले नाहीत. हा प्रकार नेहमीचाच झाल्यामुळे संप्तत झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शल्य चिकित्सकांची खुर्ची दालनाबाहेर काढून या प्रकाराचा निषेध केला. यापुढे असाच प्रकार पुढे चालू राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, आनंद आमले, आशिष रघुवंशी आदींनी दिला आहे.