गुन्हे वाढल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकच जबाबदार !
By Admin | Updated: July 4, 2015 00:43 IST2015-07-04T00:43:31+5:302015-07-04T00:43:31+5:30
सणासुदीच्या दिवसांत गुन्हेगार सक्रिय होण्याची दाट शक्यता असते.

गुन्हे वाढल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकच जबाबदार !
गृहराज्यमंत्री राम शिंदे : तपासाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न
अमरावती : सणासुदीच्या दिवसांत गुन्हेगार सक्रिय होण्याची दाट शक्यता असते. पोलिसांनीही सक्रियता वाढविणे गरजेचे ठरते. या काळात गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस अधीक्षकांचीच राहिल. त्यांनाच दोषी धरण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी पत्रपरिषेदत दिली.
शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गुन्हेगारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले. गुन्हेगारीसंदर्भात चौकशीकरिता विशेष पथके तयार करण्यात आलीत. गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांनी योग्य ते निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, पोलीस अधीक्षक लख्मी गौतम व अन्य जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. विभागातील गुन्हेगारीच्या तुलनेत शिक्षेचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
पत्रपरिषेदवर बहिष्कार
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात दुपारी १ वाजता पत्रपरिषेदेचे आयोजन केले. मात्र पाऊण तासानंतरही पत्रपरिषदेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे उपस्थित पत्रकारांनी राज्यमंत्र्यांच्या परिषेदवर बहिष्कार घातला. तासभरानंतर आमदार सुनील देशमुख व पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांनी पत्रकारांची समजूत काढली. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी झालेल्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
जबरी चोरी,
घरफोड्या चिंताजनक
हत्या, दरोड, हत्येच्या प्रयत्न या गुन्ह्यांचा तपास समाधानकारक आहे. यामध्ये शंभर टक्के डिटेक्शन होते. याबद्दल गृहराज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, जबरी चोरी, घरफोड्यांच्या घटनांमध्ये डिटेक्शन कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सराईत गुन्हेगारांविरूध्द कलम ३२८ नुसार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यात.