जिल्हा हिवताप कार्यालय आजारी
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:30+5:302016-03-16T08:29:30+5:30
जिल्हा हिवताप कार्यालय सद्यस्थितीत अनेक समस्यांनी ग्रस्त असून मंगळवारी दुपारी १.१५ वाजता दरम्यान या कार्यालयाला भेट दिली असता ...

जिल्हा हिवताप कार्यालय आजारी
अधिकारी बेपत्ता : चार वर्षांपासून पाणीच नाही
संदीप मानकर अमरावती
जिल्हा हिवताप कार्यालय सद्यस्थितीत अनेक समस्यांनी ग्रस्त असून मंगळवारी दुपारी १.१५ वाजता दरम्यान या कार्यालयाला भेट दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी, कर्मचारी गायब होते. मागील चार वर्षांपासून या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
जिल्हा हिवताप अधिकारी प्रदीप लव्हाळे न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात बाहेर गेल्याचे सांगण्यात आले, तर जिल्हा हिवताप पर्यवेक्षक ज्ञानेश्वर डोंगरे, सहायक अधिकारी सी.आर.मुंदरे आदी अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे येथील कनिष्ठ लिपिक आस्थापना बी.एल.वानखडे हे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. हे कार्यालय अनेक समस्यांनी ग्रस्त असून कार्यालयाच्या फलकावर अनेक दिवसांपासून पालापाचोळा साचला आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दुचाकी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराच्या आत लावल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर कार्यालयाच्या बेसिन्समध्ये घाण साचली आहे. शौचालय व प्रसाधनगृहांचीदेखील दुरवस्था झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून हिवताप निर्मूलनाची जबाबदारी, या कार्यालयावर आहे. परंतु हे कार्यालयाच आजारी असल्याने दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनेक कर्मचारी लेटलतीफ
येथे २२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश लेटलतीफ असतात. त्यामुळे तालुका पातळीवरून कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. मंगळवारी या कार्यालयात अगदी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याची सोयही नाही
विभागीय प्रशिक्षण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधला होता. त्यावेळी खोदकाम करताना हिवताप कार्यालयाचे नळ कनेक्शन कापण्यात आले होते. तेव्हापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे. येथे जिल्हा कुष्ठरोग कार्यालय, हत्तीरोग कार्यालय व हिवताप कार्यालय आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही.