जिल्हाधिकारी गंभीर : आयुक्त हर्षदीप कांबळेंशी चर्चा

By Admin | Updated: July 2, 2016 00:02 IST2016-07-02T00:02:24+5:302016-07-02T00:02:24+5:30

बंदी असलेल्या तंबाखूजन्य आणि इतर सुगंधी पदार्थांची अमरावती शहर आणि जिल्ह्यात धडाक्यात विक्री सुरू आहे.

District Magistrate: Discussion with Commissioner Harshdeep Kamble | जिल्हाधिकारी गंभीर : आयुक्त हर्षदीप कांबळेंशी चर्चा

जिल्हाधिकारी गंभीर : आयुक्त हर्षदीप कांबळेंशी चर्चा

एफडीए अधिकाऱ्यांवर कारवाईसाठीचा प्रस्ताव
अमरावती : बंदी असलेल्या तंबाखूजन्य आणि इतर सुगंधी पदार्थांची अमरावती शहर आणि जिल्ह्यात धडाक्यात विक्री सुरू आहे. तथापि अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते हे अन्न व औषधी विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांना पाठविणार आहेत. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारसही या अहवालात केली जाईल.
अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून जिल्हाधिकाऱ्यांनी सुमारे अडिच कोटी रुपयांचा गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखूचा साठा बुधवारी जप्त केला. हा साठा सील करण्यापासून तर नष्ट करेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घातले. गुरुवारी अर्धा साठा नष्ट करण्यात आला. उर्वरित साठा नष्ट करण्याची प्रक्रिया शुक्रवारी उशीरा रात्रीपर्यंत सुरु होती. अत्यंत वर्दळीच्या वस्तीत इतका अवाढव्य गुटखा- तंबाखू साठवून ठेवण्यात आला. परंतु हे घडू न देण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले, असे निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. अमरावती शहरात एफडीएचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे आणि सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांची कार्यालये आहेत. त्यांच्या अधिनिस्थ अधिकाऱ्यांची चमू कार्यरत ंआहे. मानवी शरीराला घातक असलेल्या तमाम वस्तुंवर नियंत्रण ठेवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. आंबे पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे कॅल्शियम कार्बाईड, उपाहारगृहांतून वापरले जाणारे घातक खाद्यपदार्थ, चायनिज गाड्यांवर वापरले जाणारे जिवघेणे अजिनोमोटो, सर्वत्र पानटपऱ्यांवर उपलब्ध होणारे गुटखा-सुगंधी तंबाखु यांचा अमरावती शहरात, जिल्ह्यात आणि विभागात उघड वापर सुरू आहे.

शहरात गुटख्याची आणखी गोदामे
अमरावती : शहर व ग्रामीण पोलिसांनी अनेकदा कारवाई करून गुटखा जप्त केला. वृत्तपत्रांनी पुराव्यानिशी वृत्त प्रकाशित केले. स्टिंग आॅपरेशन करून पोलखोल केली. सामाजिक संघटनांनी गुटख्यांचे फर्रे खरेदी करून बंदीसाठी आंदोलने केलीत.
समाजात चहुबाजूने बंदी असलेल्या पदार्थांच्या विक्रीविरुद्ध आवाज उठविला जात असताना अन्न व औषधी प्रशासनाचे तमाम अधिकारी मूकदर्शक होते. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: भला मोठा ऐवज जप्त करण्याची कारवाई केली. अशा ऐवजाचा साठा असलेले शहरात अनेक मोठी गोदामे आणि हा ऐवज विकणारे घाऊक विक्रेते असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. या तमाम मुद्यांची जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याशी चर्चा केली. एफएडीए अधिकाऱ्यांचा सुरू असलेला ‘कारभार’ हर्षदीप कांबळे यांच्या कानावर त्यांनी घातला. यासंबंधाने तसा अधिकृत अहवालच एफडीए आयुक्तांना पाठविणे या चर्चेअंती ठरले. लकवरच हा अहवाल एफडीआय आयुक्तांपर्यंत पोहोचेल. (प्रतिनिधी)

महसूल अधिकाऱ्यांचे कार्य ‘काबिल-ए-तारीफ’
गुटखा-तंबाखू जप्तीच्या मोहिमेत जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे, अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे आणि संबंधित तलाठ्यांच्या चमुने केलेले कार्य निर्विवादपणे ‘काबिल-ए-तारीफ’ आहे. छापा मारण्यापासून अवघा साठा जाळून नष्ट करेपर्यंतची मोहीम दोन दिवस पुरणारी होती. एफडीएचे पुरेसे सहकार्य नसतानाही महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि जपलेली कर्तव्यदक्षता आगळा आदर्श घालून देणारी आहे.

सामान्यांच्या आरोग्याशी हा खेळ आहे. एफडीए अधिकाऱ्यांची निष्क्रीयता दुर्लक्षित करण्याजोगी नाही. एफडीए आयुक्तांशी चर्चा झाली. येथील अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयेचा अहवाल पाठविणार. कारवाईची शिफारस करणार.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी
 

Web Title: District Magistrate: Discussion with Commissioner Harshdeep Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.