२० हजार बारदाना खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By Admin | Updated: March 10, 2017 00:24 IST2017-03-10T00:24:40+5:302017-03-10T00:24:40+5:30
यावर्षी तुरीचे उत्पन्न बरे झाले. एवढ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या तुरीची खरेदी बुधवारपासून बारदान्याअभावी थांबली.

२० हजार बारदाना खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
दोन केंद्र नव्याने सुरू करणार : सुटीच्या दिवशीही नाफेडची खरेदी
अमरावती : यावर्षी तुरीचे उत्पन्न बरे झाले. एवढ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या तुरीची खरेदी बुधवारपासून बारदान्याअभावी थांबली. शेतकऱ्यांची बारदान्याची समस्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला गुरुवारी सकाळी भेट दिली व तत्काळ २० हजार बारदाना खरेदी करण्याबाबतचे निर्देश त्यांनी एफसीआयला दिले. 'लोकमत'ने शासकीय तूर खरेदी केंद्रातील ‘शेतकऱ्यांच्या दैना’ लोकदरबारात मांडली होती.
यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे, तलाठी पाटेकर, एफसीआयचे खरेदी अधिकारी वैभव मुंदरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, बारदान्याच्या कमतरतेमुळे तुरीच्या खरेदीची प्रक्रिया थांबता कामा नये. याकरिता एफसीआयने बाजार समितीकडून तत्काळ २० हजार बारदाना लोन तत्त्वावर घ्यावा व तुरीची खरेदी सुरू करावी. धान्य साठवणीच्या समस्येवर त्यांनी सीडब्यूसीचे गोदाम तत्काळ उपलब्ध करून तेथे वीजपुरवठा करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एफसीआयने तीन दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाची किंमत द्यावी. तूर खरेदीच्या वेळी व्यावहारिक पद्धतीने तुरीची श्रेणी, वजन व माप ठरविण्यात यावे, बाजार समितीने व्यापारांना कमी किमतीत तूर खरेदीची परवानगी देऊ नये, असे करताना आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी नाफेडच्यावतीने बडनेरा व धारणी येथे नवीन तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश संबंधिताना दिले. येत्या गुडीपाडव्यापर्यंत तुू खरेदीची प्रक्रिया पूर्ण व्हावी याकरिता सुटीच्या दिवशीदेखील तुर खरेदीची प्रक्रीया सुरु ठेवण्यात येईल असे सांगितले. (प्रतिनिधी)