‘इली, सारी’ आजाराचे रुग्ण शोधून तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST2021-03-18T04:14:10+5:302021-03-18T04:14:10+5:30
अमरावती : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाने १५ मार्चला नव्या गाईड लाईन जारी केल्या. त्यांची जिल्ह्यात अंमलबजावणीच्या अनुषंगाने ...

‘इली, सारी’ आजाराचे रुग्ण शोधून तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाने १५ मार्चला नव्या गाईड लाईन जारी केल्या. त्यांची जिल्ह्यात अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी सायंकाळी आदेश जारी केले. त्यानुसार बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची घरोघरी जाऊन तपासणी करावी व ‘इली व सारी’चे आजार असलेले रुग्ण शोधून, त्यांची तपासणी करावी लागणार आहे.
कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या किमान २० ते ३० व्यक्तींची माहिती शोधावी व या पथकातील व्यक्तींना प्रशिक्षण द्यावे आणि त्यांची दर ५ ते १० दिवसांनी कोरोना चाचणी करण्याचे आदेश आहेत. जास्तीत जास्त संशयित व्यक्तींच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात याव्यात, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी परिसरात आयएटी किटचे वितरण करावे. प्रतिबंधित क्षेत्रात रॅपिड ॲक्शन टीम तयार कराव्या, त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्या व पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये, यासाठी फौजदारी व दंडात्मक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या चाचण्या कराव्या. लक्षणे असणाऱ्या सर्व रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्याविषयी नोंदणीकृत सर्व डॉक्टरांना सूचना द्याव्या. शासकीय अधिकारी, कर्मचारी, हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण करावे. याशिवाय संक्रमित व्यक्तींची माहिती, त्यांचे संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती, प्रतिबंधात्मक क्षेत्रात होणाऱ्या घडामोडी, ‘होम आयसोलेशन’मधील व्यक्तींची सूक्ष्म माहिती देणारी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले आहेत.
बॉक्स
पुन्हा पथकांद्वारे दंडात्मक कारवाया
उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, वर्षा पवार, राम लंके, उदयसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रत्येकी पाच असे एकूण २० पथकांचे गठण करण्यात आले आहे व या पथकांद्वारे १८ ते २० मार्च दरम्यान दंडात्मक कारवायांची विशेष मोहीम महापालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी संबंधितांना दिले आहेत. या पथकात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी राहणार आहेत.