जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली झेडपीला नोटीस
By Admin | Updated: January 11, 2017 00:10 IST2017-01-11T00:10:25+5:302017-01-11T00:10:25+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली झेडपीला नोटीस
निवडणूक : आचार संहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश
अमरावती : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत अद्यापही विषय समितीच्या मासिक बैठकी सुरू आहेत. तसेच शासकीय वाहने देखील जमा करण्यात आली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिलीे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ४ जानेवारी रोजी जाहीर केला. त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता अमरावतीसह संपूर्ण विभागात अंमलात आली आहे. मात्र, आचारसंहितेबाबत अनेक शासकीय कार्यालयांत संभ्रम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद, महापालिका व अन्य सर्व विभागांना लेखी स्वरूपात ५ जानेवारी रोजी कळविण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही जि.प.मध्ये सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा पार पडली. यासभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नसला तरी विविध मुद्यांवर चर्चा झाली.दुसरीकडे मिनीमंत्रालयातील शिलेदारांची वाहने सुद्धा आचारसंहितेमध्ये धावत असल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईचा अहवाल मागविला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घरपोच मिळणार
‘व्होेटर स्लिप’
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांना घरपोच ‘वोटर स्लिप’ पोहोचविली जाणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठलेही साहित्य वाटप होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सूचना तहसीलदार, पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
एसडीओ, तहसीलदारांवर धुरा
जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि १० पंचायत समितीच्या गणांसाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. सर्व तहसीलदारांकडे ‘एआरओ’ म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
एकाच वेळी निवडणुकीची शक्यता
सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच मनपा निवडणूक एकाचवेळी होण्याचे स्पष्ट केले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.