जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत मंत्री, आमदारांच्या उमेदवारीने चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:01 IST2021-09-04T05:00:00+5:302021-09-04T05:01:00+5:30
राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, धारणीचे आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी हे जिल्ह्यातील प्रमुख नेते सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’ टाकत असल्याने ही निवडणूक रंगणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत मंत्री, आमदारांच्या उमेदवारीने चुरस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तब्बल ११ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीत राज्यमंत्री, आमदारांनी उमेदवारी दाखल केल्याने मोठी चुरस वाढली आहे. शुक्रवारपर्यंत ११८ उमेदवारांनी संचालक पदासाठी नामांकन दाखल केले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, धारणीचे आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी हे जिल्ह्यातील प्रमुख नेते सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’ टाकत असल्याने ही निवडणूक रंगणार आहे. बॅंक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मतदारांच्या भेटीगाठीचे सत्र चालविले आहे. २१ संचालक पदासाठीच्या निवडणुकीत १६८६ मतदार संख्या आहे. एक -एक मत आपल्याकडे कसे खेचता येईल, यासाठी रणनिती आखली जात आहे. आता तर मंत्री, आमदार थेट या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे मतदारांसाठी ‘अच्छे दिन’ मानले जात आहे. विशेषत: सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी ही निवडणूक पर्वणी ठरणारी आहे. हल्ली शहर, गाव, खेड्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची धुमशान सुरू झाले आहे.
२३ सप्टेंबरपासून प्रचाराला वेग
८ ते २२ सप्टेबर या दरम्यान नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार आहे. रिंगणातील उमेदवारांना २३ सप्टेंबर रोजी बोधचिन्हाचे वाटप होणार असून, त्यानंतर थेट प्रचाराला वेग येणार आहे. उमेदवारांना ११ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. ४ ऑक्टोंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.
अनेकांचे राजकीय अस्तित्व पणाला?
जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत हल्ली उमेदवारांची भाऊगर्दी बघायला मिळत आहे. मात्र, २२ सप्टेंबर रोजी नामांकन मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे कोण मैदान सोडते आणि कोण कायम राहते, हे ‘विड्रॉल’ नंतर चित्र होणार स्पष्ट होणार आहे. २३ सप्टेंबरपासून रणधुमाळी सुरु होईल. उमेदवारांनी केलेली गर्दी बघता ‘लक्ष्मीदर्शन’ साठी तर ही उमेदवारी नाही, अशी शंका येत आहे.