जिल्हा बँकेच्या ८८ शाखांची सेवा ठप्प
By Admin | Updated: May 12, 2015 00:19 IST2015-05-12T00:19:13+5:302015-05-12T00:19:13+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघटनेव्दारा सोमवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार ...

जिल्हा बँकेच्या ८८ शाखांची सेवा ठप्प
६०० कर्मचारी संपावर : रोखलेल्या वेतनवाढीसह महागाई भत्ता हवाच
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघटनेव्दारा सोमवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासल्याने जिल्हा बँकेच्या ८८ शाखांचे कामकाज बंद पडले आहे. दररोजची ३५ कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ईतर घटकांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६०० कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने २०११ पासून कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले महागाई भत्ते दिलेले नाहीत. संघटनेनी मागण्यांसाठी पाठपुरावा केला असता, बँकेच्या व्यवस्थापनाने दिलेला शब्द पाळला नाही. चार वर्षांपासून बँक नफ्यात असताना आर्थिक स्थिती नसल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांना भत्ता नाकारला गेला. व्यवस्थापनाचे कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरली आहे. या संपात सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने बँकेच्या सर्वच शाखा बंद आहेत. महागाई भत्ते रोखल्यामुळे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून आर्थिक कोंडीत सापडले असून मुलांच्या वाढत्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, असा सवाल महिला कर्मचाऱ्यांनी केला.
बँकेच्या व्यवस्थापनाचे कर्मचारी विरोधी धोरण आहे. त्यामुळे कर्मचारी संतापले आहेत. हा अन्याय सहन करणार नाही. आता माघार नाहीच, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहील.
- प्रभाकर किलोर,
प्रमुख कार्यवाह, कर्मचारी संघटना.
जिल्हा बँकेचे व्यवस्थापन मंडळ व सीईओ यांनी कर्मचारी संघटनेसोबत समोरासमोर चर्चा करुन तोडगा काढावा. याबाबत तीन दिवसांपूर्वीच कळविले आहे. सोमवारीदेखील बोलणे झाले आहे.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.
ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकरीहित महत्त्वाचे आहे. शिस्तप्रिय व्यवस्थापनाने बँकेला नफ्यात आणले. कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. परंतु काही पदाधिकारी असंतुष्ट असतात. या चर्चेतून काही निष्पन्न होणे नाही. हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे.
- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक