कोरडवाहू अभियानात जिल्हा माघारला
By Admin | Updated: November 17, 2014 22:43 IST2014-11-17T22:43:51+5:302014-11-17T22:43:51+5:30
जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानाचा दर्जा घसरल्यामुळे

कोरडवाहू अभियानात जिल्हा माघारला
शासन उद्देशाला हरताळ : लोकसहभागाअभावी निधी अखर्चित
जितेंद्र दखने - अमरावती
जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानाचा दर्जा घसरल्यामुळे हे अभियान जिल्ह्यात माघारले आहे. या अभियानासाठी शासनाकडून ३ कोटींहून अधिक निधी उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांकडून मिळणारा हा निधी अद्यापही अखर्चित आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानासाठी नऊ तालुक्यांतून १३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र आहे आणि उपाययोजना केल्या तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, असे क्षेत्र नेहमीसाठीच कोरडवाहू राहते. या क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी ही योजना राबविली जाते. सन १३-१४ पासून शासनाने कोरडवाहू शेती अभियान उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत हे अभियान राबविण्यात येते. शासनाकडून ज्या गावांची निवड या अभियानासाठी केली आहे, त्या गावांमध्ये दरवर्षी विविध योजनांवर १ कोटी रुपये खर्च केला जातो. यामध्ये तीन वर्षांत एका गावावर साधारणत: ३ कोटी रुपयांचा खर्च होतो. अभियानाच्या माध्यमातून जवळपास सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मनुष्यबळ विकास कार्यक्रम, गटसंघटन, सिंचन प्रक्रियेमध्ये तुषार व ठिबक सिंचन, प्राथमिक कृषी प्रक्रिया यांत्रिकीकरण अशा उपक्रमांचा समावेश आहे. यासाठी ज्या गावांची निवड झाली तेथील शेतकऱ्यांना ५० टक्के लोकसहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
जिल्ह्याला गेल्या वर्षी कोरडवाहू अभियानासाठी १ कोटी ९१ लाख रुपये प्राप्त झाले होते. ही पूर्ण रक्कम खर्च करण्यात आली. यंदा या उपक्रमासाठी ३ कोटी ११ लाख रुपये प्राप्त झाले असून यापैकी ३४ लाख रुपये खर्च झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.