मुद्रांक विक्रीचा जिल्ह्यात गोंधळ
By Admin | Updated: December 9, 2014 22:43 IST2014-12-09T22:43:17+5:302014-12-09T22:43:17+5:30
शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या १०० रूपयांच्या मुद्रांक विक्रीसाठी अनेक किचकट नियम लावल्याने मुद्रांक विक्रेत्याद्वारा बऱ्याचदा मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते.

मुद्रांक विक्रीचा जिल्ह्यात गोंधळ
अमरावती : शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या १०० रूपयांच्या मुद्रांक विक्रीसाठी अनेक किचकट नियम लावल्याने मुद्रांक विक्रेत्याद्वारा बऱ्याचदा मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते. याचा फटका ग्राहकांना बसत आहे, मुद्रांकाचा तुटवडा निर्माण होत आहे.
हक्कसोडपत्र, खरीदीपत्र, हरविले, सापडले यासह विविध दाखले घेण्यासाठी १०० रूपयांच्या मुद्रांकाची सर्वाधिक मागणी असते. मुद्रांकांच्या एकूण विक्रीमध्ये ५० टक्के मुद्रांक हे १०० रूपयांचे आहेत. या शंभर रूपयांच्या मुद्रांकासाठी राज्य शासनाद्वारा अनेक किचकट नियम केले आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांची गोची झाली आहे. केवळ तीन रूपयांच्या कमीशनवर कागदोपत्री नोंदीची कामे मोठ्या प्रमाणात वाढल्याने विक्रेत्यांनी या मुद्रांकाची विक्रीसाठी टाळाटाळाची धोरण अवलंबिले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
शंभर रूपयांचा मुद्रांक विकताना विक्रेत्याला दहा ते बारा कॉलमची माहिती भरावी लागते. मुद्रांक कोण घेणार? कोणासाठी घेणार? कामाचे स्वरुप काय?, पत्ता, तारीख, खरेदीदाराला पावती देणे, त्याची सही घेणे, कर्ज काढण्यासाठी मुद्रांक घेत असल्यास कर्ज किती रूपयांचे? बँक कोणती? जामीनदार कोण? आदी माहिती नियमाने मुद्रांक विक्रेत्यांना भरावी लागते. या कामासाठी या विक्रेत्याला ३ रूपये कमीशन मिळतात. त्यामुळे विक्रेत्यांद्वारा टाळाटाळ केली जाते. (प्रतिनिधी)