ग्राहकांना पावती न देताच अंत्योदय योजनेच्या धान्याचे वाटप
By Admin | Updated: October 16, 2015 00:47 IST2015-10-16T00:47:37+5:302015-10-16T00:47:37+5:30
तालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत.

ग्राहकांना पावती न देताच अंत्योदय योजनेच्या धान्याचे वाटप
भ्रष्टाचार : पुरवठा विभागाची बघ्याची भूमिका
उमेश होले दर्यापूर
तालुक्यात ग्रामीण भागात १३४ तर शहरात १० स्वस्त धान्य वितरकांची दुकाने आहेत. परंतु काही दुकानदार शिधापत्रिकाधारकांना माल विक्रीच्या पावत्या न देताच विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
ग्रामीण भागात व शहरात अन्न सुरक्षा योजनेचे ९६ हजार ४२४ लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देणे अपेक्षित आहे. यामध्ये २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. आॅगस्ट महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी १३८१ क्विंटल धान्य विभागाला प्राप्त झाला व लाभार्थ्यांना वितरित झाल्याचे बोलले जात आहे. परंतु सप्टेंबरमध्ये या योजनेच्या गहू, तांदळाचा तुटवडा असल्यामुळे व मालच न प्राप्त झाल्याने आॅगस्टमधील उरलेला २८२ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदूळ वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. दिवाळी, दसरा तोंडावर असताना गरिबांच्या घरात धान्य नाही, हा प्रकार गंभीर आहे.
वडनेरगंगाई येथील एका लाभार्थ्याने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे.
लाभार्थ्यांना पावती मिळत नसल्यामुळे परस्परच हे धान्य दुकानदार पावत्या लिहून घेतात व लाखो रुपयांचा गौरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकाराला तालुका पुरवठा अधिकारी बी.एन. राठोड यांचे अभय असल्याचे समजते. त्यांनी दोन वर्षांत ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी केली नाही. पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुये गरीबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारांच्या घश्यात जात आहे.