प्रसूतांना दूषित पाणी - माता, नवजातांना धोका
By Admin | Updated: November 12, 2014 22:34 IST2014-11-12T22:34:59+5:302014-11-12T22:34:59+5:30
प्रसूतीसााठी अथवा इतर आजारांसाठी जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांना पूर्णत: दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नवजात अर्भकांसह प्रसूतांनाही गंभीर आजारांची लागण होत आहे.

प्रसूतांना दूषित पाणी - माता, नवजातांना धोका
डफरीनमधील पाणी १०० टक्के अशुध्द : रूग्णांचे नातलगही आजारी
वैभव बाबरेकर - अमरावती
प्रसूतीसााठी अथवा इतर आजारांसाठी जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांना पूर्णत: दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नवजात अर्भकांसह प्रसूतांनाही गंभीर आजारांची लागण होत आहे. डफरीनमधील सर्व जलस्त्रोतांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता ते दूषित आढळून आले. या भयंकर प्रकाराबद्दल रूग्णालय प्रशासन मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते.
जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल होणाऱ्या महिला रूग्णांसमवेत त्यांचे नातलगही असतात. दूषित पाण्यामुळे येथे येणारे सुदृढ नागरिकही विविध आजार घेऊन जात आहेत. विरोधाभास म्हणजे या रुग्णालयात प्रसूतांना सकस आहार देण्यात येतोे. मात्र दूषित पाणीच प्यावे लागते. यामुळे जलजन्य आजारांचा प्रादूर्भाव नवजात बाळांमध्येही बळावत असताना रूग्णालय प्रशासन फारसे गंभीर नाही.
डफरीनमध्ये आरोग्य निरीक्षकाचे पद नसल्याने रुग्णालयातील पाणी शुध्दीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. डफरीन रुग्णालयाला जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन रुग्णालयाच्या आवारातील दोन विहिरींमध्ये सोडण्यात आल्या आहेत. त्या दोन विहिरींचे पाणी रुग्णालयातील प्रत्येक वार्डापर्यंत पोहोचविण्यात येते. त्याकरिता प्रत्येक वार्डामध्ये नळ बसविण्यात आले आहेत. काही वार्डात पाणी शु्ध्दीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. विहिरीतील पाणी शुध्द करण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांकडे देण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्याला पाणी शुध्दीकरणाबाबत कोणतीही माहिती नसल्याने तो अपूर्ण माहितीच्या आधारे विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकतो. त्यामुळे विहिरीत पाणी शुध्द होत नाही. तसेच डफरीनमधील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. परिणामी या दूषित पाण्यामुळे बाळ-बाळंतीणींचे आरोग्य धोक्यात आले आहे. रूग्णालयात रूग्णांना आरोग्याची हमी मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र, येथेच अशुध्द पाणी आणि घाणीचा प्रादुर्भाव असेल तर रूग्णांनी कोणाकडे दाद मागावी हा प्रश्नच आहे.