शिवसेनेची दुष्काळ प्रश्नावर बंदद्वार चर्चा
By Admin | Updated: September 24, 2015 00:29 IST2015-09-24T00:29:25+5:302015-09-24T00:29:25+5:30
राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही.

शिवसेनेची दुष्काळ प्रश्नावर बंदद्वार चर्चा
दिवाकर रावते यांचे मार्गदर्शन : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा सल्ला
अमरावती : राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही. याच पार्श्वभूमिवर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळ, शेतकरी प्रश्नांवर बुधवारी बंदद्वार चर्चा करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्यात.
येथील शासकीय विश्राम भवनात ना. दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीला आ. श्रीकांत देशपांडे, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, नाना नागमोते, प्रशांत वानखडे, दिनेश बूब, दिंगबर मानकर, पंजाबराव तायवाडे, बाळासाहेब भागवत, शिवसेनेच्या महिला नेत्या शोभा लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी ना. रावते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांना दुष्काळग्रस्त भागात जावून बळीराजाला जगण्याची उमेद द्यावी लागणार आहे. विशेषत: हे अभियान विदर्भ, मराठवाड्यात राबविले जात आहे. शासन योजनेचा लाभ श्ोतकऱ्यांना मिळावा, यासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ना. रावते यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ची माहिती दिली. नवीन विहिरींची योजना, जलयुक्त शिवार योजना, रोहयोतून विविध कामे करुन शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नांची परकाष्ठा करावी, असा सल्ला त्यांनी दिला. ना. रावते हे दुष्काळ प्रश्नांवर शिवसैनिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने आले असले तरी जिल्ह्यात शिवसेनेत आलेली मरगळ झटकण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)