दररोजच्या जेवणात ‘भाकरी’चा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:48+5:302021-04-07T04:12:48+5:30
पान २ ची बॉटम बळीराजाची व्यथा, अन्नधान्यात ज्वारीच महत्त्व अबाधित, चढा दर परवडेना गुरुकुंज मोझरी : गरिबाच्या ताटातील ...

दररोजच्या जेवणात ‘भाकरी’चा शोध
पान २ ची बॉटम
बळीराजाची व्यथा, अन्नधान्यात ज्वारीच महत्त्व अबाधित, चढा दर परवडेना
गुरुकुंज मोझरी : गरिबाच्या ताटातील हक्काच्या भाकरीला आज श्रीमंती लाभली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीमुळे गरिबांना भाकरीचा शोध घ्यावा लागतो, अशी ग्रामीण जनतेची व्यथा झाली आहे.
महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आजही आवडीने भाकरी खाल्ली जाते. कारण भाकर हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून व त्याच्या मिश्रणातून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात, ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स मिळतात, ज्यामुळे गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आहारात सर्व प्रकारच्या धान्याच्या भाकरीचा नक्कीच समावेश होऊ शकतो. कारण ती आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे. भाकरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्कृष्ट भाकरी बनविण्यासाठी अंगी कसब लागते. त्यातही हातावर तयार करून चुलीच्या तप्त लाल निखाऱ्यावर भाजलेली गरमागरम भाकरीची चवच न्यारी.
आजच्या गृहिणींना ती कसब अवगत करून घ्यावी लागते. कधीकाळी वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली जायची. उत्त्पन्न भरघोस येत होते. पण, परिस्थिती झपाट्याने बदलली. शिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढीला लागला अन् अकस्मात या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. सोयाबीनचा पेरा वाढीस लागला. सुरुवात उत्तम झाली, पण आता सोयाबीनसारख्या पिकाच्या उत्पादनात दरवर्षी कमालीची घट येत आहे. आता शेतकऱ्याला ज्वारीचे पीक घेण्याची इच्छा असली तरी हिंमत होत नाही. कारण एकाच ठिकाणी ज्वारीसारखे पशूपक्ष्यांचे आवडते खाद्य उत्पादन केल्यास त्याची राखण करणे जोखमीचे आहे. रानडुकरासारखे प्राणी त्यावर ताव मारतात, तर पक्ष्यांचे जत्थे हाती आलेले पीक खाऊन फस्त करतात.
कोठारे ओस
पूर्वजांच्या काळापासूनच निर्माण केलेली ज्वारीची कोठारे आज ओस पडून आहेत. पूर्वी खोल खड्डा खणून तयार केलेले पेव घरोघरी होते. त्यात ज्वारी साठविली जायची. मात्र, आज पेव दुर्लभ झाले आहे. आजही वृद्धांना भाकरीची मेजवानीच हवीहवीशी वाटते. कारण तिला आवश्यक पाण्यापासून तर कुठल्याही पेय पदार्थात कुस्करून टाकता येते. पचनासाठी सुलभ आहे.
----------
पोत्याची ज्वारी किलोने
भाकरीसोबत मिरचीचा ठेचा ही न्याहारी कधीकाळी ठरलेली असायची. त्यावेळी घरात पोत्याने असणारी ज्वारी आज किलोने विकत घ्यावी लागते. आज तीच भाकरी श्रीमंतांच्या ताटात सन्मानाने विराजमान झाली. गरीब कष्टकरी मजूर आजच्या चढ्या बाजारभावात विकत घेण्यास विचार करूनही त्याकडे डोळेझाक करतो. कारण तितक्याच पैशात इतर स्वस्त धान्य अधिक प्रमाणात उपलब्ध होते.