आॅटोरिक्षाचालकांना लागतेय शिस्त
By Admin | Updated: September 29, 2015 01:52 IST2015-09-29T01:52:22+5:302015-09-29T01:52:22+5:30
नव्या वस्तीकडून शिस्तीत प्रवासी घेण्याचे आदेश १५ दिवसांपासून नव्याने रूजू झालेले रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस

आॅटोरिक्षाचालकांना लागतेय शिस्त
बडनेरा : नव्या वस्तीकडून शिस्तीत प्रवासी घेण्याचे आदेश १५ दिवसांपासून नव्याने रूजू झालेले रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस निरीक्षकांनी आॅटोचालकांना दिले आहे. सध्या आॅटो पार्किंगमधूनच प्रवासी घेतले जात आहेत. यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून बडनेऱ्याच्या रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग झोन उभारण्यात आले आहे. मात्र आॅटोचालक नियमाने प्रवासी बसवित नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये वृत्तदेखील प्रकाशित झालेले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनी अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र प्रशासनाने याची कधीच दखल घेतलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांनी रेल्वेस्थानक परिसरातील विस्कळीत आॅटो थांब्याला शिस्त लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
काही दिवस नीटनेटके चालणाऱ्या आॅटोचालकांनी मात्र त्यात नियमितता ठेवली नाही. नव्याने बडनेऱ्यातील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात सी.एस. पटेल हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी सर्वप्रथम आॅटो शिस्तीत चालले पाहिजे. हा उपक्रम हाती घेतला आहे. तब्बल १५ दिवसांपासून आॅटोचालक शिस्तीने प्रवासी बसवित आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाने आॅटो चालकांना आॅटो पार्किंग लेनमध्येच उभे करण्याचे व एकएक आॅटो सोडून प्रवासी बसविण्याची जी शिस्त घालून दिली आहे, ती नेहमीसाठीच सुरू रहावी, अन्यथा यापूर्वीदेखील याचप्रमाणे प्रयत्न करण्यात आले. मात्र ते फार दिवस टिकू शकले नाही. रेल्वे प्रशासनाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांचा गोंधळ उडत नाही. इतर वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत नसल्याचे चित्र याठिकाणी आहे. त्यामुळे प्रवासी वर्ग सुखावला आहे. आता ही शिस्त कायमस्वरुपी राहावी, अशी अपेक्षा आहे.
इतरही वाहनांना नियम घालून द्यावे
रेल्वे स्थानक परिसरातून आॅटो, मिनीडोअर व शहर बसेस चालतात. सध्या आॅटोचालकांना पार्किंग झोनमध्येच उभे राहून प्रवासी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच मिनीडोअर व शहर बसचालकांनादेखील कायदेशीररीत्या प्रवासी घेण्याची शिस्त लावण्यात यावी. ज्यामुळे बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून प्रवाशांना डोकेदुखी ठरणारा विस्कळीत वाहतुकीचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल.
खासगी प्रवासी गाड्यांची धुडगूस
आॅटोचालकांना नियमाने प्रवासी घेण्याचा नियम लावून देण्यात आला आहे. आॅटोचालक दिलेल्या नियमाने सध्यातरी प्रवासी आॅटोमध्ये बसवीत आहेत. मात्र काळी-पिवळी व खासगी प्रवासी वाहनचालक राजरोसपणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातूनच प्रवासी बसवीत आहेत, हे नियबाह्य आहे. याकडे रेल्वे सुरक्षा बलाचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक लक्ष देतील काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
आॅटो युनियनने केली 'कॉन्स्टेबल'ची मागणी
बडनेरा आॅटो युनियनने या उपक्रमाचे स्वागतच केले आहे. पार्किंगमधून आॅटो सोडण्याचा उपक्रम जेवढा प्रवासी वर्गांसाठी चांगला आहे, तेवढाच आॅटो चालकांनादेखील पार्किंगमध्ये आॅटो लावण्यास सोयीचे आहे. मात्र काही आॅटो रेल्वेस्थानक परिसरात इतरत्र फिरुन प्रवासी बसवित आहेत, असे व्हायला नको. ज्यामुळे शिस्तीत चालणाऱ्या आॅटोचालकांना प्रवासी मिळणार नाही. नियम सर्वांसाठी सारखाच असावा. आॅटो पार्किंगमध्ये तसेच शिस्तीतच लावावे, यासाठी बडनेरा आॅटो युनियनने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन येथे पूर्णवेळ दोन कॉन्स्टेबल तैनात करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे लावून दिलेली शिस्त टिकून राहील, असे म्हणणे आहे.