दक्षता समितीची बैठक न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई
By Admin | Updated: January 24, 2015 22:45 IST2015-01-24T22:45:59+5:302015-01-24T22:45:59+5:30
दक्षता समितीची नियमित बैठक न घेतल्यास त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे.

दक्षता समितीची बैठक न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई
अमरावती : दक्षता समितीची नियमित बैठक न घेतल्यास त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जिवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने राज्यात दक्षता समित्या गठित केल्या आहेत. विविध स्तरावरील दक्षता समितींची बैठक प्रत्येक महिन्यात नियमितपणे घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे समितीची बैठक न घेणाऱ्या संबंधित सदस्य व सचिवाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्रैमासिक अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने ८ जानेवारीला संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.
राज्य शासनाने राज्यात ग्राम, तालुका, नगरपरिषद, महापालिका व जिल्हास्तर दक्षता समित्या गठित केल्या आहेत. दक्षता समितीची बैठक महिन्यातून एकदा घ्यावी तसेच दक्षता समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याची संपूर्ण जबाबदारी समितीच्या सदस्य सचिवाची असते. जिल्हा स्तरावरील दक्षता समितीच्या अध्यक्षांना काही अपरिहार्य कारणामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दिनांकास बैठक घेणे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. सर्व स्तरावरील दक्षता समित्यांना त्यांच्या कार्यक्षेत्र अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारी संदर्भात आवश्यक कारवाई करून त्याबाबतचा त्रैमासिक अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)