बदलीसाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई
By Admin | Updated: May 15, 2015 00:05 IST2015-05-15T00:05:07+5:302015-05-15T00:05:07+5:30
राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो.

बदलीसाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई
अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो. त्यामुळे बदल्यांच्या काळात मोजक्याच जागी अथवा चांगले पद मिळविण्यासाठी आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींकडून वशिला दबाव आणण्याचेही प्रमाण अधिक असते. मात्र दबाव तंत्राचा वापर केल्यास कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या विरोधात आश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी व बदल्यांची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवीन शासनाने बदली कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मध्यावधी बदल्या करताना या कायद्यातील तरतुदीचे पालन करण्याच्या सूचना आणि आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्मचाऱ्यांची अथवा अधिकाऱ्यांची बदली करु नये. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एप्रिल - मे मध्ये केल्या जाव्यात. एखाद्या प्रकरणात ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तणुकीची तक्रार असल्यास आणि त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच त्या कर्मचाऱ्यांची बदली करायची की नाही, पुरावे झाल्याशिवाय शिफारस करता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
गैरप्रकारांना आळा बसणार
एखाद्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप अथवा कारवाई प्रस्तावित झाल्यास त्या कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी. मात्र त्या कर्मचाऱ्याला पदावर ठेवणे योग्य नाही, असे आढळून आले तर त्याची योग्य अशी कारणमीमांसा देत त्यांच्या बदलीची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करावी. स्वत:च्या सोयीसाठी अनेक कर्मचारी बदली करुन घेतात.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
वर्षातून केवळ एप्रिल, मे महिन्यातच बदल्या कराव्यात. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली प्रस्तावित करु नये. कोणत्याही संवर्गासाठी धोरण सारखेच ठेवावे. तीन वर्षांच्या आधीच कर्मचाऱ्यांची बदली करायची झाल्यास त्यासाठी योग्य कारणे सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती घ्यावी. दबावतंत्राचा वापर केल्यास आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. बदली कायद्याचे काटेकोर पालन करावे.