अचलपूरच्या नगराध्यक्षांवर अविश्वास
By Admin | Updated: July 31, 2015 00:45 IST2015-07-31T00:45:19+5:302015-07-31T00:45:19+5:30
स्थानिक पालिकेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्याविरुध्द गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ३८ पैकी तब्बल ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने ...

अचलपूरच्या नगराध्यक्षांवर अविश्वास
खळबळ : प्रस्तावावर ३८ पैकी ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या
अचलपूर : स्थानिक पालिकेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्याविरुध्द गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ३८ पैकी तब्बल ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव पारित करण्यासाठी विशेष सभेची मागणी करण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जुळ्या नगरीच्या नगराध्यक्षपदी वर्षभरापूर्वी अविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्याविरुध्द नगरसेवकांमध्ये काही दिवसांपासून धुमसत असलेली नाराजी आता जाहिररीत्या बाहेर आली आहे. पालिका वर्तुळात एकूण ३८ नगरसेवक असून गुरुवारी त्यापैकी तब्बल ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नगराध्यक्षांवर विश्वास नाही
जिल्ह्यातील 'अ' वर्ग नगरपालिका असलेल्या अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्यावर आमचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र म्युनिसिपल काऊंसिल नगर पंचायत व इंडस्ट्रीज टाऊनशिप र.नं. १९६१ च्या कलम ५५ नुसार अविश्वास ठराव दाखल करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात नगरसेवकांनी नमूद केले आहे.
माझ्या जवळ पुरेसे संख्याबळ : नगराध्यक्ष
अविश्वास प्रस्ताव सादर झाला असला तरी आपल्याजवळ अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यासाठी नगरसेवकांचे पुरेसे संख्याबळ असल्याचे नगराध्यक्ष नंदवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. अविश्वास प्रस्ताव बारगळण्यासाठी ११ पेक्षा जास्त नगरसेवक सोबत आहेत. त्यामुळे प्रस्तावाचे काय होणार?, हे काळच ठरवेल.
अरुण वानखडे पुन्हा होणार नगराध्यक्ष?
विद्यमान नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सादर करुन नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा अरुण वानखडेंना विराजमान करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यात आर्थिक उलाढाल होणार असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे ४ रुपयांपेक्षा अधिक दर प्रत्येक नगरसेवकांसाठी ठरल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.