जिल्ह्यात आपदास्थिती
By Admin | Updated: July 14, 2014 23:41 IST2014-07-14T23:41:15+5:302014-07-14T23:41:15+5:30
जिल्ह्यातील ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर या खरिपाच्या पेरणी क्षेत्रापैकी केवळ ७५ हजार ८५८ क्षेत्रातच पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी १०.६१ इतकी आहे. पावसाच्या १०० दिवसांपैकी ५४ दिवस उलटून गेले आहेत.

जिल्ह्यात आपदास्थिती
सरासरी उत्पन्न घटणार : सात लाख हेक्टरवरील पेरणी रखडली
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर या खरिपाच्या पेरणी क्षेत्रापैकी केवळ ७५ हजार ८५८ क्षेत्रातच पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी १०.६१ इतकी आहे. पावसाच्या १०० दिवसांपैकी ५४ दिवस उलटून गेले आहेत. सोयाबीनला फुलोर येण्याचा हा कालावधी. पण, यंदा अद्याप पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे पीक बदल आवश्यक झाला आहे.
वास्तविक शेतकऱ्यांना आपाद स्थितीची जाणीव करुन देत पीक पेरणीत आवश्यक ते बदल करण्याचा सल्ला कृषी विभागाने द्यायला हवा. मात्र, जिल्हास्तरावर साधी बैठक घेण्याचे भानही या विभागाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात सरासरी २७० मि.मी. इतका पाऊस व्हायला हवा होता. पण, प्रत्यक्षात ९६.८ मि.मी. इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असून सरासरी उत्पन्न किमान ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
मागील हंगामात जुलै अखेरपर्यंत ६१३ मि.मी. पाऊस पडला होता. परंतु यंदा सद्यस्थितीत केवळ ९६ मि.मी. पाऊस पडला आहे. दीड महिन्यात केवळ ३ दिवस पाऊस पडला. कृषी विभागाच्या ११ जुलैच्या पीक पेरणी अहवालानुसार जिल्ह्यातील ९८ टक्के क्षेत्रात अद्याप पेरणीच झालेली नाही. अशा स्थितीत घरी आणलेल्या बियाण्यांचे काय करावे? या विवंचनेत शेतकरी आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने खरीप व रबी हंगाम हातचा गेला. यातून कसेबसे सावरून शेतकऱ्यांनी महागडी खते, बी-बियाणे खरेदी केली. मात्र, त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. मूग, उडदाच्या पेरणीची वेळ निघूून गेली. हा आठवडा संपताच सोयाबीन पेरणीचा कालावधीही संपुष्टात येईल. पीक बदलामुळे यंदा कपाशीचे पेरणीक्षेत्र हजारो हेक्टरनी वाढणार आहे. आंतरपिकासाठी तुरीचे पेरणीक्षेत्रही वाढेल. सध्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. परंतु कृषी विभागाच्या बेपर्वाइमुळे शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती मिळत नाही.
अचलपुरात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ९६.८ मिमी. पाऊस पडला आहे. आजवरची जिल्ह्याची पावसाची सरासरी २७०.८ मि.मी. असावयास हवी. परंतु पावसाने मारलेल्या दांडीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आहे. यंदाचा सर्वाधिक पाऊस चिखलदरा तालुक्यात १४४.६ मि.मी., तर सर्वात कमी ४७.५ मि.मी. पाऊस अचलपूर तालुुक्यात पडल्याची नोंद आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास जिल्ह्याचे विदारक चित्र राहील.
कृषी विभागाचे बेपर्वा धोरण
जल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे भीषण सावट आहे. मागील वर्षीचा खरीप व रबी हंगाम पावसाने गारद झाला. सोयाबीन फुलोरावर येण्याचा हा काळ असतानासुध्दा अद्याप सोयाबीनची पेरणीच झालेली नाही. पेरणीचा दीड महिन्यांचा कालावधी संपला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पीक बदल आवश्यक आहे. परंतु याविषयी कृषी विभागाने साधी बैठकही बोलावलेली नाही किंवा गावपातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे भानही कृषी विभागाला नाही.