शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय
By Admin | Updated: July 20, 2015 00:16 IST2015-07-20T00:16:17+5:302015-07-20T00:16:17+5:30
निंभोरा परिसरातील शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय
गैरसोयीचा सामना : समाजकल्याण उपायुक्तांनी सोडविले उपोषण
बडनेरा : निंभोरा परिसरातील शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याचा संताप व्यक्त करीत शेकडो विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारी उपोषण सुरू केले होते. याची दखल घेऊन समाजकल्याण उपायुक्त डी.डी. फिसके यांनी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शनिवारी उपोषण मागे घेण्यात आले.
निंभोरा परिसरातील यशवंत वसतिगृहात राहत असलेल्या ५५ विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था निट नाही. अस्वच्छतेची समस्या, स्टेशनरी भत्ता मिळत नाही, प्रकाश व्यवस्था नाही, आवारात झाडेझुडुपी वाढल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच शुक्रवार १७ जुलै रोजी उपोषणाला सुरुवात केली. याची दखल समाजकल्याण उपायुक्त डी.डी. फिसके यांनी घेऊन वसतिगृहाला भेट दिली. येथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी उपोषण मागे घेतले. उपोषणात कुणाल जाधव, आशिष राठोड, ऋषिकेश कुऱ्हेकर, रणजित तायडे, दीपेश वाहाने, सागर कुऱ्हेकर आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. (शहर प्रतिनिधी)
दरवर्षी करावे लागतात आंदोलन
या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सर्व सोयी-सुविधा मिळण्याची तरतूद केल्याचे दाखविण्यात येते. मात्र अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागतात. त्यामुळे दरवर्षी आंदोलनाच्या या समस्यांकडे माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचे कष्ट या विद्यार्थ्यांना उपसावे लागत आहे. येथील समस्या कायमस्वरुपी सोडविण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी उपायुक्त फिसके यांना यावेळी केली.