श्रीक्षेत्र सालबर्डीत भाविकांची गैरसोय
By Admin | Updated: January 31, 2016 00:22 IST2016-01-31T00:22:30+5:302016-01-31T00:22:30+5:30
मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डीचा विकास खुंटला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

श्रीक्षेत्र सालबर्डीत भाविकांची गैरसोय
अजय पाटील मोर्शी
मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डीचा विकास खुंटला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
सालबर्डीत एक महिन्यानंतर महाशिवरात्रीनिमित्ताने मोठी यात्र भरते व दूरदुरून भाविकभक्तगण लहान महादेवाच्या दर्शनासाठी येथे येतात. परंतु सालबर्डी येथे ये-जा करण्याकरिता माडू नदीवर बांधण्यात आलेला पूल खचला आहे. खचलेल्या पुलामध्ये गोटे व रेती टाकली असून तो पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने भाविकांचे जीवन धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची दखल घेऊन हा पूल तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी जि. प.च्या महिला बालकल्याण सभापती वृषाली विघे यांनी केली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातून लाखो भाविक भक्तगण व पर्यटक श्रावण मासमध्ये व महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. सालबर्डी येथे प्राचीन शिवलिंग, चक्रधर स्वामी, मारोती महाराज, भगवान महाराज, दादाजी धुनिवाले, दरबाल, रामसितेची गरम थंड पाण्याची नान्ही असल्याने येथे वर्षभर उत्सव तसेच महोत्सव साजरे केले जातात. याशिवाय शेकडो पर्यटक पर्यटनासाठी येत असल्याने महसूल गोळा होतो. महाशिवरात्रीनिमित्य भरत असलेल्या यात्रेत विविध दुकानदारांसाठी पंचायत समिती मोर्शीतर्फे प्लॉटस् विकल्या जातात त्यातून सुद्धा उत्पन्न प्राप्त होते. परंतु मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सिमेवर असल्यामुळे दोन्ही राज्यातील शासन व प्रशासन जाणीवपूर्वक या तिर्थक्षेत्रात दुर्लक्ष करीत असल्यामुळे सालबर्डीचा विकास खुंटला आहे. पर्यटकांची व भाविकांची सातत्याने होणारी गैरसोय पाहता दोन्ही सरकारच्या शासन व प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये तीव्र असंतोष धुमसत आहे. याठिकाणी असलेले अनेक प्राचीन मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.