अपंग व्यक्ती घरकुलापासून वंचित
By Admin | Updated: June 2, 2015 00:04 IST2015-06-02T00:04:14+5:302015-06-02T00:04:14+5:30
येथून जवळच असलेल्या भातकुली तालुकाअंतर्गत मार्की येथील प्रफुल्ल बापुराव खटे यांचे वडील अपंग असूनसुध्दा त्यांना

अपंग व्यक्ती घरकुलापासून वंचित
पूर्णानगर : येथून जवळच असलेल्या भातकुली तालुकाअंतर्गत मार्की येथील प्रफुल्ल बापुराव खटे यांचे वडील अपंग असूनसुध्दा त्यांना घरकुलापासून सरपंच व सचिव यांच्या हेकेखोरपणामुळे हेतुपुरस्सर घरकुलापासून वंचित ठेवल्याचा आरोप पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मार्की येथील रहिवासी असलेले प्रफुल्ल बापुराव खटे यांचे वडील अपंग असून त्यांना राहण्याकरिता निवारा नाही. ते कुडामातीच्या घरात वास्तव्य करीत आहेत. ग्रामपंचायत मार्कीचे दारिद्र्यरेषेच्या प्रमाणपत्रानुसार १४ गुण असून अनु क्र. ६९ असा आहे. ही व्यक्ती ४० टक्के अपंग आहे. या परिवाराचे कोणतीही व्यक्ती कमावती नाही. शासकीय नियमानुसार घरकुलास ही व्यक्ती पात्र असून त्यांच्या नावाची जागादेखील आहे. यासंदर्भात खटे यांनी २३ मार्च २०१५ रोजी गटविकास अधिकारी सीओ प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांचेकडेदेखील निवेदन दिले आहेत. त्यांनी यासंदर्भात दखल घेऊन शासन परिपत्रक ८/९/२००८ व शासनपत्र २ जानेवारी २०१४ मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मौका पाहणी तथा दस्तऐवजांची तपासणी व खात्री करुन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी व अहवाल पाठवावा, असे पत्र दिले. परंतु मार्की येथील ग्रामसेवकाने पाहणी केली नसून तसा अहवालदेखील पाठविला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता आम्हाला तेवढेच काम आहे काय, असे सांगितल्या जाते. याप्रकरणी पूर्ण चौकशी करुन अपंग व्यक्तींना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी खटे परिवाराने केली आहे. अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)