नदीपात्रातून रेती चोरी गेल्यास आता थेट कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:00+5:302021-01-08T04:37:00+5:30
फोटो - जिल्हाधिकारी शैलेश नवाल बोटीमध्ये बसून पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, बोटीतून केली नदीची पाहणी धामणगाव रेल्वे : महसूल ...

नदीपात्रातून रेती चोरी गेल्यास आता थेट कारवाई
फोटो - जिल्हाधिकारी शैलेश नवाल बोटीमध्ये बसून पाहणी करताना
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, बोटीतून केली नदीची पाहणी
धामणगाव रेल्वे : महसूल उत्पन्नाचा स्रोत म्हणजे रेती व इतर गौण खनिज आहेत. प्रशासकीय यंत्रणेने या संपत्तीचे रक्षण करणे गरजेचे आहे. यानंतर वर्धा नदीपात्रातून रेतीची तस्करी झाली. यात तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित यंत्रणेची चौकशी करून दोषी आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी दिले.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली, विटाळा या घाटांतून मंगळवारी रेती उत्खनन करणारे पंचवीस तराफे महसूल विभागाने जप्त केले. जिल्हाधिकारी नवाल यांनी या घाटांची तसेच वर्धा नदीपात्राची बोटींतून पाहणी केली. रेती तस्करी अनेक दिवसांपासून सुरू आहे. वर्धा नदीपात्रातून रेती तस्करी करणाऱ्यांवर आता थेट शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. एका तस्कराची दोन ते तीन वेळा वाहने जप्त झाली, तर अशा वाहनमालकावर कठोर कारवाई महसूल प्रशासनाने करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार गौरवकुमार भळगाटिया, चांदूर रेल्वेचे नायब तहसीलदार विलास वाढोणकर, तलाठी व मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याची यंत्रणा हजर होती.