राज्य शासनाच्या तिजोरीतून पगार थेट खात्यात
By Admin | Updated: September 11, 2014 23:10 IST2014-09-11T23:10:02+5:302014-09-11T23:10:02+5:30
कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या नव्याने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीतून विविध विभागांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

राज्य शासनाच्या तिजोरीतून पगार थेट खात्यात
गतिमानता : सीएमपी प्रणालीचा होणार उपयोग
अमरावती : कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या नव्याने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीतून विविध विभागांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालयातून लवकरच या प्रणालीची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.
लवकरच ही प्रणाली सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार आता त्यांच्या कार्यालय प्रमुखांऐवजी कोषागार कार्यालयातून केला जाईल. मागील काही दिवसांत शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना तातडीने त्यांचा पगार देण्यासाठी सेवार्थ, शालार्थ, कृषार्थ आदी प्रणाली विकसित झाल्या आहेत. विभागानुसार या प्रणाली कार्यरत असल्या तरी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून संबंधित कार्यालयप्रमुखांना त्यांच्यासह त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य भत्ते तसेच खर्चाच्या देयकांची रक्कम ईएफटी किंवा एनईएटी प्रक्रियाद्वारे दिली जायची. कार्यालयप्रमुख स्वतंत्र धनादेश बँकेला देऊन आरटीजीएसद्वारे ती रक्कम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळती करीत होते.
या प्रक्रियेत दर महिन्याचा पगार देण्यासाठी उशीर होऊ लागल्याने राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ‘सीएमपी’ ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पगार प्रक्रिया अधिक वेगवान व सोप्या पद्धतीने राबविली जाईल. या प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यात लवकरच सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)