यश प्राप्तीसाठी परिश्रम, संयमाला शिस्तीची जोड आवश्यक
By Admin | Updated: August 2, 2015 00:37 IST2015-08-02T00:37:05+5:302015-08-02T00:37:05+5:30
युनिक अॅकॅडमीच्या वतीने नुकताच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण ...

यश प्राप्तीसाठी परिश्रम, संयमाला शिस्तीची जोड आवश्यक
अमरावती : युनिक अॅकॅडमीच्या वतीने नुकताच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वीतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी अॅड. गणेश हलकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप काळे, २०१२ मध्ये आयएएसपदी निवड झालेल्या मोर्शी तालुक्यातील रहिवासी भाग्यश्री बानाईत, युनिक अॅकॅडमीचे संचालक प्रा.अमोल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी स्वप्निल वानखडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद सांगून आपल्या चार वर्षाच्या खडतर तयारीचे अनुभव कथन केले. ते म्हणाले, मी एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होतो. चार वर्षे या कंपनीत कार्य केल्यानंतर नागरी सेवेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून मनाशी ध्येय निश्चित केल्यानंतर मी यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. सलग तीनवेळा मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत जाऊन मला अपयश आले. त्यावेळी मी खूप निराश झालो. परंतु न खचता नागरी सेवेत जायचेच असा निश्चय केला. २०१४ मध्येही पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. यावेळीही मुलाखतीत मला कमी गुण मिळाले. परंतु मुख्य परीक्षेतील गुणांमुळे मला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. यावेळीही मुलाखतीत मला कमी गुण मिळाले, परंतु मुख्य परीक्षेतील गुणांमुळे अधिकारीपदी निवड झाल्याचे स्वप्निल वानखडे यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात. पंरतु सर्वांनाच यश येत नाही. त्यासाठी अभ्यासाला दृष्टिकोन हवा. यशासाठी नशीब साथ देणे गरजेचे असले तरी विद्यार्थ्यांनी नशीबावर जास्त अवलंबून न राहता कठोर परिश्रमावर भर द्यावा, त्यासोबतच सहनशिलता ठेवून त्याला शिस्तीची जोड द्यावी. अपयशातून शिकणारा प्रत्येकजण यशस्वी होतो. स्पर्धा परीक्षेतही अपयशाने खचून न जाता जोमाने तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांना यश हमखास मिळते असे स्वप्निल वानखडे यांनी सांगितले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी किरण गित्ते, भाग्यश्री बानाईत यांनीही आपले यूपीएससीच्या तयारीचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले. यावेळी यीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या स्वप्निल वानखडेसह अक्षय खंडारे तसेच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारे स्वप्निल तांगडे, डॉ.विजय भुया, ज्ञानेश्वर टाकरस, शिल्पा नगराळे, परमानंद गावंडे लक्षांती अलोने, जयंत मालवे, रोहित भारुखा, मुकुंद भक्ते, विजया भुया, मंगेश कुऱ्हाडे, विशाल रोकडे, सूरज सुसतकर, संदीप बोरकर, युवराज राठोड, आशिष शिंदे, देवेंद्र केमेकर, गणेश मोरे, निशा खोब्रागडे, प्रणील पाटील, अनिकेत कडू आदी विद्यार्थ्यांची मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मानसिकता बदलविण्याची गरज या विषयावर अॅड. गणेश हलकारे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिक अॅकॅडमीचे संचालक प्रा.अमोल पाटील, संचालन सुप्रिया पाटील आणि आभार प्रदर्शन प्रदीप डिकोंडावार यांनी केले. सत्कार सोहळ्याला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. (वा.प्र)