भूमिअभिलेखमध्ये 'डिजिटलायजेशन' आरंभ
By Admin | Updated: February 2, 2015 22:56 IST2015-02-02T22:56:28+5:302015-02-02T22:56:28+5:30
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील १२५ वर्षापूर्वीच्या अर्थात ब्रिटिशकालिन कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजिटलायजेशनची

भूमिअभिलेखमध्ये 'डिजिटलायजेशन' आरंभ
नवा प्रयोग : पहिल्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेश
अमरावती : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील १२५ वर्षापूर्वीच्या अर्थात ब्रिटिशकालिन कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजिटलायजेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मिळून तब्बल पाच हजार दस्तऐवजांचे पानांकन करण्यात व्यस्त आहेत.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये काही वर्षांपूर्वी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. या ई-अभिलेखी प्रकल्पाची आता अमरावती जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात अमरावती, भातकुली, अचलपूर, तिवसा व अशा पाच तालुक्यांत हा प्रकल्प राबविला जात आहे. मार्च अखेरपर्यंत या तालुक्यातील जुने व जीर्ण दस्ताऐवज डिजिटलायजेशन केले जाणार आहे. त्यासाठी अमरावती विभागाची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. खासगी कंपनीमार्फत मोठमोठे स्कॅनर व तांत्रिक साधनांच्या साहाय्याने हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. ब्रिटिश राजवटीत देशात १८३० ते १८७० या कालावधीत पहिली जमीन मोजणी झाली होती. यानंतर हे व्यापक स्तरावरील काम सध्या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. कालबद्ध उपक्रमांतर्गत २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन्ही वर्षात उपसंचालक भूमिअभिलेख, नगरभूमापन आणि तहसीलस्तरावर हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील जमिनींच्या पुनर्मोजणीच्या दृष्टीने सध्या राज्य शासनाने यासाठी पावले उचलली आहेत. त्याचीच आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे भूूमिअभिलेख विभाग अद्ययावत होणार आहे.
अधिकार अभिलेखे प्रामुख्याने राहणार डिजिटल
भविष्यातील भूमिअभिलेखे, अधिकारी अभिलेखे हे प्रामुख्याने डिजिटल होणार आहेत. जनतेला ते विशिष्ट फी भरुन आॅनलाईन बघता येतील. त्यासाठी जमिनीचा ई-पुनर्मोजणी प्रकल्प राबविणे अनिवार्य असून त्या अनुषंगाने आता या हालचाली सुरू झाल्या आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सध्या ई -मोजणी, ई-चावडी, ई-फेरफार आणि ई-नोंदणी हे चार उपक्रम राबविले जात असल्याचे उपसंचालकांनी सांगितले.
दस्तऐवजांचे विविध प्रकार
भूमिअभिलेख कार्यालयात टिपण उतारा, प्रमाणित दस्ताऐवज, मोजमाप, गुणकारक बुक, आकार खोड पत्रक, एकत्रिकरण योजना नोंदवही, फिल्डबुक, आकारबंद पत्रक, शेतजमिनीचा गोषवारा आदींचे स्कॅनिंग केले जात आहे.