पेट्रोलमध्ये डिझेल, शेकडो वाहने जाम
By Admin | Updated: January 1, 2015 22:54 IST2015-01-01T22:54:21+5:302015-01-01T22:54:21+5:30
वलगावमार्गावरील एका पेट्रोल पंपावरून वाहनधारकांना भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करण्यात आल्याने अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहनधारकांमध्ये पेट्रोलपंप संचालकाविरूध्द रोष उफाळून आला.

पेट्रोलमध्ये डिझेल, शेकडो वाहने जाम
असोरिया पेट्रोल पंपावरील घटना : वाहनधारकांची पोलिसांत तक्रार
अमरावती : वलगावमार्गावरील एका पेट्रोल पंपावरून वाहनधारकांना भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करण्यात आल्याने अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहनधारकांमध्ये पेट्रोलपंप संचालकाविरूध्द रोष उफाळून आला. शेवटी शेकडो नागरिकांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पेट्रोल पंप संचालकाविरूध्द तक्रार नोंदविली.
वलगाव मार्गावर ६२ वर्ष जुने भारत पेट्रोलियम कंपनीचे असोरिया पेट्रोल पंप आहे. इतवारा बाजार परिसरातील रहिवासी राजेश असोरिया यांच्या मालकीचा हा पेट्रोल पंप आहे. ते दररोज रात्री १०.३० वाजता पेट्रोल पंप बंद करतात. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला म्हणजे ३१ डिसेंबर २०१४ रोजी अनेक दुचाकीधारकांसह अन्य वाहनचालकांनी पेट्रोल भरले. परंतु काही अंतर जाताच त्यांच्या वाहनांचे इंजिन लॉक झाले.
मॅकेनिकला वाहन दाखविले असता त्यांनी पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे कारण सांगितले. गुरूवारी एका पाठोपाठ एक तब्बल ६० ते ७० वाहनधारक पेट्रोल पंपावर पोहोचले. परंतु पेट्रोल पंप बंद असल्याने त्यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. सगळ्यांनीच भेसळयुक्त पेट्रोल सोबत आणले होते.
नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्ता गावडे यांनी चपराशी पुरा निवासी जय रोडवेज ट्रान्सपोर्टचे संचालक इमरान खान यांच्या तक्रारीवरून पेट्रोल पंप संचालक राजेश असोरिया यांच्या विरूध्द ईसी अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद केली. पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती ठाणेदार गावंडे यांनी दिली.