बडनेरा आगारातून बसमध्ये सहा महिन्यांपासून डिझेल भरणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:39 IST2017-10-29T22:39:03+5:302017-10-29T22:39:18+5:30
एसटी आगाराचा डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद असल्याने या येथील बसेसमध्ये अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे.

बडनेरा आगारातून बसमध्ये सहा महिन्यांपासून डिझेल भरणे बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : एसटी आगाराचा डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद असल्याने या येथील बसेसमध्ये अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे. यासाठी चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायाने आर्थिक नुकसानही वाढले आहे. आगार व्यवस्थापकाने याची दखल घ्यावी, असे चालकांमध्ये बोलले जात आहे.
बडनेरा आगारातून मोठ्या संख्येत प्रवासी ये-जा करतात. या आगारातून ४२ बसेस धावतात. बीड, लातूर, छिंदवाडा, भोपाळ, नांदेड, बºहाणपूर व इतरही ठिकाणी बडनेºयाच्या आगारातून बसेस जातात. लांब पल्ल्याचा प्रवास आटोपल्यावर बडनेरा आगारातील चालकांना दुसºया दिवसासाठी अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे. सहा महिन्यांपासून येथील पंप बंद आहे. १९८७ सालापासून हे डीझेल पंप सुरू होते. जुनी मशीन बंद करून डिझेल कंपनीने नवीन मशीनदेखील येथे बसविली. मात्र कुठल्या कारणामुळे हा पंप बंद आहे, हे समजू शकले नाही. डिझेल याच आगारातून भरल्यास चालकांचा वेळ वाचतो. अमरावती डेपोत जाणे व येण्यासाठी लागणारा डिझेलचा अतिरिक्त आर्थिक बोझा एसटी महामंडळावर पडत आहे. अमरावती डेपोत त्या ठिकाणच्या बसेस व बडनेºयातील बसेसचा बोझा एकाच पंपावर पडतो आहे. अर्धा ते एक तास डिझेल भरण्यासाठी थांबावे लागत आहे. याचा मन:स्ताप वाढल्याची ओरड होत आहे. डिझेल भरण्याची सोय बडनेरा आगारातूनच केली जावी, अशी मागणी होत आहे.
गाड्या धुणेही बंद
बडनेरा एसटी आगारातील गाड्या स्वच्छ करणे काही महिन्यांपासून बंद आहे. पाणीपंप बंद आहे. प्रवासी उलटी करतात अशा बसेस जशाच्या तशाच येथून प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याने प्रवासी वर्गात संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शासन स्वच्छतेवर भर देत आहे. बडनेरा आगारात मात्र बसेस न धुताच प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याचे हे अशोभनीय चित्र पहावयास मिळत आहे.