केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद
By Admin | Updated: June 3, 2016 00:17 IST2016-06-03T00:17:13+5:302016-06-03T00:17:13+5:30
न्यायालयाच्या आदेशानंतर घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ...

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद
परिस्थितीचा आढावा : केंद्र शासनाकडे सादर करणार अहवाल
अमरावती : न्यायालयाच्या आदेशानंतर घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाचे पाच सदस्ययीय अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक निती आयोगाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी रामानंद यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते.
या पथकाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (हिरापूर) व बोपी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. वरिष्ठ संशोधन अधिकारी कृषी निती आयोग नवी दिल्लीचे रामानंद, अव्वर सचिव ग्रामीण विकास राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे संचालक जे.के.राठोड, उपसंचालक जलसंधारण विभाग मिलिंद पानपाटील, सहायक प्रबंधक भारतीय खाद्य निगम एम.एम.बोऱ्हाडे, मदत, पुनर्वसनचे उपसंचालक आत्राम यांचा समावेश होता. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी विधाते, तहसीलदार वाहुरवाघ आदींची देखील उपस्थिती होती.
बेलोरा (हिरापूर) गावातील सरपंच सुधीर चौधरी यांनी पथकातील रामानंद यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. मागील वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापुस आणि तूर या पिकांकरिता केलेला खर्चही वसूल झाला नाही. पिकांना अपुऱ्या पावसामुळे मोठा फटका बसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडली.
मागील चार वर्षापासून सोयाबीन उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. अपुऱ्या पावसामुळे विहीर, बोरवेलच्या पाण्याचा जलस्तर मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. बेलोरा गावातील पाच पैकी तीन विहिरी कोरडया पडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना एक किलोमिटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे गाऱ्हाणे गावकऱ्यांनी पथकासमोर मांडले.
ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा
अमरावती : गावात दोन विहिरींना पाणी आहे. मात्र ते खारे असल्यामुळे पिण्यास अयोग्य असल्याचे ग्रामस्थ अक्षय पाटील यांनी सांगितले. पीककर्जाबाबतीतही शेतकऱ्यांनी पथकासमोर व्यथा मांडली. कें द्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी गुरांच्या चाऱ्याबाबत माहिती जाणून घेतली दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने यंदा खरीप हंगामासाठी मोफत बियाणे पुरवावेत, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी पथकाकडे रेटून धरली.
यावर्षीची दुष्काळाची मोठी झळ लक्षात घेता शासनाने शेतकरी व नागरिकांना दिलासा देणे महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांनी रामानंद यांच्या नेतृत्त्वातील पथकाला पटवून दिले. यावेळी गावपातळीवर पाणीटंचाई, शेततळे, जलयुक्त शिवार अभियानातून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याच ठिकाणी कारवाई बाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शु.रा.सरदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यानंतर ‘शेतीची उत्पादकता’ याविषयी गावकऱ्यांकडून अधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणे नोंदविली. यानंतर पथकाने बोपी गावाला भेट दिली. तेथील पंकज सोळंके, भानुदास टाले या शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाबाबतची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)