धारणीचे प्रकल्प कार्यालय आदिवासी योजनांसाठी गैरसोयीचे
By Admin | Updated: February 26, 2015 00:13 IST2015-02-26T00:13:14+5:302015-02-26T00:13:14+5:30
आदिवासी समाजाचा विकास, प्रगती आणि उत्थानासाठी कार्यरत आदिवासी विकास विभागाचे धारणी येथील प्रकल्प कार्यालय योजना राबविण्यासाठी गैरसोयीचे ठरत आहे.

धारणीचे प्रकल्प कार्यालय आदिवासी योजनांसाठी गैरसोयीचे
अमरावती : आदिवासी समाजाचा विकास, प्रगती आणि उत्थानासाठी कार्यरत आदिवासी विकास विभागाचे धारणी येथील प्रकल्प कार्यालय योजना राबविण्यासाठी गैरसोयीचे ठरत आहे. आदिवासीबहुल भागासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले असले तरी निधी अखर्चीक ठेवण्याची खेळी अधिकारी करीत आहे. या गंभीर बाबीकडे अप्पर आयुक्तांचे दुर्लक्ष असून आदिवासींना योजनांपासून वंचित ठेवले जात आहे.
चिखलदरा, धारणी तालुक्यात बहुसंख्येने आदिवासी वास्तव्यास आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय धारणी येथे स्थापित करण्यात आले. या प्रकल्प कार्यालयात अधिकारी हे आयएएस असावे, अशी नियमावली आहे. मात्र धारणी येथील प्रकल्प कार्यालयाने वेळेपूर्वी अनेक योजना राबविल्या नसल्याने कोट्यवधीचा निधी अखर्चीक आहे.
धारणी हे जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. परिणामी धारणी, चिखलदरा तालुका वगळता जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील आदिवासींना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी धारणीत ये- जा करावी लागते. खरे तर प्रकल्प कार्यालय हे अकोला पॅटर्ननुसार जिल्ह्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. परंतु धारणीचे प्रकल्प कार्यालय हे योजना राबविताना आदिवासी करिता लाभदायक ठरणारे आहे. चिखलदरा, धारणी हे दोन तालुके वगळता उर्वरित १२ तालुक्यांत आदिवासी बांधव शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात कमी जास्त प्रमाणात आदिवासी वास्तव्यास आहेत. मात्र, दोनच तालुक्यापुरता विचार करुन प्रकल्प कार्यालयाचा कारभार सुरु असल्याने निधी अखर्चिक राहतो. नुकत्याच झालेल्या लेखा अंकेक्षण परिक्षणात धारणी येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाने निधी अखर्चिक ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्प कार्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यास आदिवासींना विविध योजनांचा लाभ घेण्याचे सुकर होईल, अशी मागणी आदिवासी संघटनांची आहे.