धारणी मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढणार
By Admin | Updated: July 29, 2016 00:20 IST2016-07-29T00:20:34+5:302016-07-29T00:20:34+5:30
अमरावती - बुरहाणपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याचे आश्वासन ....

धारणी मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढणार
वकील संघाचे पत्र : अखेर बांधकाम विभाग सक्रिय
धारणी : अमरावती - बुरहाणपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणीचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी दिले. शहरातील मुख्यमार्गाची समस्या तत्काळ निकाली काढा अन्यथा तालुका वकील संघाकडून उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देणारे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले होते. या पत्राच्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पाटणकर यांनी कळविले.
शहराच्या मध्यभागातून अमरावती - बुरहाणपूर मुख्यमार्ग जातो. याच एकमेव मार्गावर प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर सर्वाधिक दुकानांचा पसारा मुख्य मार्गापर्यंत पसरविला जात आहे. त्यापुढे वाहनांची रीघ व हातठेल्यांची रेलचेल यामुळे शहर अतिक्रमणात तर आहेच. पण मुख्य मार्गसुद्धा पूर्णपणे अतिक्रमणधारकांच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. अतिक्रमणाचा विळखा इतका वाढता आहे की, २०० मीटरचा ‘नो पार्किंग झोन’ दाबविणारा नामफलकसुद्धा अतिक्रमणधारकांनी व्यापून टाकला आहे.
या अतिक्रमणाबाबत तालुका वकील संघाने नुकतेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा पत्र देऊन ही समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्याची विनंती करतानाच लवकरच कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. परिणामी याकडे महसूल व पोलीस प्रशासनाकडून तत्काळ बांधकाम विभागाला पत्र देऊन कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम विभागाकडून लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)