धामणगावात दीड हजार नागरिकांनी केली स्वत:हून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:16+5:302021-03-04T04:22:16+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यात दीड हजार नागरिकांनी शासकीय रुग्णालये व आयोजित शिबिरांमध्ये गत १५ दिवसांत तपासणी केली. साधी सर्दी, ...

धामणगावात दीड हजार नागरिकांनी केली स्वत:हून तपासणी
धामणगाव रेल्वे : तालुक्यात दीड हजार नागरिकांनी शासकीय रुग्णालये व आयोजित शिबिरांमध्ये गत १५ दिवसांत तपासणी केली. साधी सर्दी, थोडा खोकला, ताप असला तरी कुटुंबाची जबाबदारी ओळखून हे पाऊल उचलले गेले.
धामणगाव शहरासह तालुक्यातील ६० गावांमध्ये कोरोना शिरला आहे. शहरातील ३३० जणांना कोरोनाची लागण झाली. तालुक्यात आजपर्यंत ७२० जणांना कोरोना झाला. यात ५६४ रुग्ण बरे झाले. ९० रुग्ण विलगीकरणात आहेत, तर १८ जणांचा मृत्यू झाला. आपल्या कुटुंबाला कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून शहर व तालुक्यातील सुज्ञ नागरिक स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत.
धामणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात दररोज तपासणी करण्यात येते, तर मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर अशा मोठ्या गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली. जळगाव मंगरुळ येथील सरपंच मनोज शिवणकर यांनी ग्रामस्थांची तसेच तळणी येथील उपसरपंच विशाल भैसे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची कोरोना चाचणी करून घेतली. विनासायास चाचणी करून घेण्याची संधी मिळत असल्याने धामणगाव नगर परिषदेचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शहर व ग्रामीण भागातील डॉक्टर यांनी स्वत:हून चाचणी करून घेतली आहे.
कोट
धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दररोज कोरोना चाचणी दुपारी १२ नंतर करण्यात येते. येथे दीड हजार लोकांनी चाचणी करून घेतली. स्वत:ची सुरक्षितता गरजेची आहे.
- डॉ. महेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे