धामणगाव पालिकेला मिळणार सव्वा कोटींचा निधी
By Admin | Updated: August 29, 2016 00:02 IST2016-08-29T00:02:10+5:302016-08-29T00:02:10+5:30
शहराने विकासाचा दुसरा टप्पा गाठला असताना नगरपरिषद ते शास्त्री चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण, ...

धामणगाव पालिकेला मिळणार सव्वा कोटींचा निधी
पालकमंत्र्यांचा पुढाकार : शास्त्री चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण
धामणगाव रेल्वे : शहराने विकासाचा दुसरा टप्पा गाठला असताना नगरपरिषद ते शास्त्री चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण, बसस्थानकाचे स्थानांतरण, धवणेवाडी रस्त्याचा विकास असा सव्वा कोटींचा भरीव निधी पालिकेला देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.
धामणगाव रेल्वे नगरपरिषदेला प्रवीण पोटे सदिच्छा भेट यांनी दिली. त्यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजपा नेते अरुण अडसड, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, मुख्याधिकारी हरिचंद्र टाकरखेडे यांची उपस्थिती होती.
शहराची वाढती लोकसंख्या व बाहेरगावावरून येणाऱ्या वाहनांची वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. म्हणून शास्त्री चौकातील बसस्थानक शिवाजी चौक येथे स्थानांतरण करण्यात येणार आहे. नगरपरिषद ते शास्त्री चौकाचे सौंदर्यीकरण, धवणेवाडी रस्त्याचा विकास आदी कामांसाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी धामणगाव शहरासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.
सक्षम नेतृत्वाने शहराचा विकास शक्य होणार आहे. धामणगाव शहराला सांस्कृतिक, साहित्यिक असा वारसा आहे. त्याप्रमाणे त्यागाचा इतिहास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य त्या काळात स्व. दादाराव अडसड यांनी केले. संघ कार्यासाठी स्वत:ची ६८ एकर जमीन विक्री केली व सामाजिक कामासाठी हातभार लावला. त्याचप्रमाणे भाजपा नेते अरुण अडसड यांनी त्याग केला आहे. मागील २० वर्षांपूर्वीचे धामणगाव शहर आणि आताचे शहर पाहिले तर या शहराचा विकासाचा वाढता आलेख दिसेल. भाजप नेते अरुण अडसड यांच्या सक्षम नेतृत्वामुळे धामणगाव शहराचा सर्वांगीण विकास झाला असल्याचे पोटे यांनी सांगून आगामी काळात पुन्हा शहर विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे ना. पोटे म्हणाले.
कार्यक्रमाला न.प. सदस्य वर्षा काकडे, अमित भोगे, दिलीप सूर्यवंशी, अशोक बुधलानी, सुनीता पाटणे, रमेश साहू, कृष्णा बुटले, अर्चना आठवले, सरिता ठोसर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोहन गावंडे, दर्शन राठी, प्रशांत बदन्नोरे, पं. स. सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष राजू गावंडे, सदस्य सचिन पाटील, वनिता राऊत, रोशन कंगाले, काशीनाथ काकडे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)