धाकुलगाव विहिरी बांधणारे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST2021-03-27T04:12:50+5:302021-03-27T04:12:50+5:30
कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील धाकुलगाव हे गाव विहिरीचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले आहे. तेथील अनेक ...

धाकुलगाव विहिरी बांधणारे गाव
कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील धाकुलगाव हे गाव विहिरीचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले आहे. तेथील अनेक जण विहीर बांधण्याचे काम करतात. तेथे मोठ्या प्रमाणात गवंडी कामगार असून विहिरीचे बांधकामही पाहिजे त्या पद्धतीचे हे कारागीर करीत असल्याने हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे आले आहे.
या गावात साधारणता पन्नास-साठच्या आसपास गवंडी काम करणारे कामगार असून त्या कामगारांना विविध तालुक्याच्या गावात काम मिळत आहे. या कामगारांकडे विहिरी बांधकामासाठी सर्व साहित्य उपलब्ध आहे. तसेच त्यांच्याकडे मजूरसुद्धा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कोठेही मजूर आणण्यासाठी फिरावे लागत नसल्याने तालुक्यातील शेतकरी या गावातील गवंडी कारागिरांना विहिरीचे बांधकाम देत आहेत. कोरोना व्हायरस आजारामुळे या कारागिरांना विहिरीचे काम मिळणे कठीण झाल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज काही प्रमाणात लॉकडाऊन कमी असल्याने विहिरीचे बांधकाम तालुक्यात जोरात सुरू असल्याचे एकंदरित चित्र आहे. विहिरीला बांधकाम करत असताना मजुरांच्या जीविताला अधिक धोका असतो. परंतु आजपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे विहीर बांधकाम कामगार पोहेकर यांनी लोकमतला सांगितले.