क्रीडा स्पर्धांविना मैदाने पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:31 IST2021-01-13T04:31:16+5:302021-01-13T04:31:16+5:30
बॉटम स्टोरी पान २ चांदूर बाजार - कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून क्रीडा स्पर्धा व वार्षिक स्नेहसंमेलन ...

क्रीडा स्पर्धांविना मैदाने पडली ओस
बॉटम स्टोरी पान २
चांदूर बाजार - कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून क्रीडा स्पर्धा व वार्षिक स्नेहसंमेलन वाचू शकले नाहीत. याशिवाय वर्षभर सराव करून स्पर्धेत नावलौकिक करण्याची मनीषा असलेल्या खेळाडूंना यंदा क्रीडा स्पर्धांत भाग घेता आलेला नसल्याने चांगलाच हिरमोड होत आहे. क्रीडा स्पर्धांविना यंदा क्रीडांगणे ओसाड पडली, तर लॉकडाऊनमध्ये सराव खंडित झाल्याने शारीरिक क्षमता पुन्हा प्राप्त करण्यासाठी खेळाडू झगडत आहेत.
ट्वेंटी-२० क्रिकेट सर्वांना आवडते. मात्र, गतवर्षीचा हा अंक कोरोना विषाणूमुळे सर्वांच्या नावडीचा ठरला. कोरोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना सहन करावा लागला. देशाची आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली तसेच आर्थिक फटकादेखील सहन करावा लागला. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले. रोजीरोटी गमवावी लागली तसेच खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याच्या संधीपासून मुकावे लागले.
खेळाडू वर्षभर सराव करून क्रीडा स्पर्धेची तयारी करतात. उत्कृष्ट कामगिरी करून पुढील जिल्हास्तरीय, राज्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड व्हावी, यासाठी प्रत्येक खेळाडू धडपडत असतो. शालेय, विद्यापीठ तसेच विविध क्रीडा संघटनांतर्फे दरवर्षी तालुका ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत असतात. मात्र, २०२० मध्ये कोरोनामुळे कोणत्याच स्पर्धा न झाल्याने खेळाडूंच्या सरावाचे चीज झाले नाही. खेळाडूंना मैदानावर सरावसुद्धा करता आला नाही. तरीदेखील अनेक खेळाडूंनी आपल्या घरच्या गच्चीवर, अंगणात शारीरिक कसरत करून शरीर निरोगी तसेच आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला.
बॉक्स
विद्यापीठ स्तरावर ३५ स्पर्धा
राज्यात शालेय स्पर्धेमध्ये अनुदानित खेळांची संख्या ४२, तर विनाअनुदानित खेळांची संख्या ३० च्या आसपास आहे. विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर ३५ च्या जवळपास खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात.