देवनाथ मठ-तीनशे वर्षांची गुरु परंपरा
By Admin | Updated: August 2, 2015 00:32 IST2015-08-02T00:32:04+5:302015-08-02T00:32:04+5:30
इ.स. १९४९-१६०० मधील पैठणच्या संत एकनाथानंतर त्यांचे परंपरेतील नित्यानंदनाथ, कृष्णनाथ, विश्वनाथ, मुऱ्हानाथ, रंगनाथ, गोपाळनाथ व देवनाथांचे गुरु...

देवनाथ मठ-तीनशे वर्षांची गुरु परंपरा
अंजनगाव सुर्जी : इ.स. १९४९-१६०० मधील पैठणच्या संत एकनाथानंतर त्यांचे परंपरेतील नित्यानंदनाथ, कृष्णनाथ, विश्वनाथ, मुऱ्हानाथ, रंगनाथ, गोपाळनाथ व देवनाथांचे गुरु गोविंदनाथ या नाथ परंपरेतील संत देवनाथ यांचा जन्म इ.स. १७५४ साली सुर्जी येथे दत्त जयंतीचे आधीचे दिवशी झाला. त्यांचे वडील राजेश्वरपंत हे तत्कालीन निजामशाहीत सुर्जी परगण्याचे प्रतिनिधी होते. आपले गुरू गोविंदनाथ यांचेकडून नाथ परंपरेची दिशा घेऊन व आपले आयुष्य कथा कीर्तन करुन भ्रमंतीत घालविण्यावर देवनाथांनी सुर्जी येथील सध्याचे देवनाथ मठाच्या जागी श्रीनाथ सदन या नावाने गुरुघर उभे केले. नाथ परंपरेतील तपश्चर्या आणि व्रतस्थ जीवनशैली सोबतच या नाथपीठाने प्रखर राष्ट्रभक्तीचे धडे, जनसामान्यांना दिले. सोबलच हिंदू धर्म परंपरेचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
देवनाथनंतर या परंपरेत दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ, मनोहरनाथ व सन २००० पासून जितेंद्रनाथ अशी समृध्द गुरुपरंपरा लाभली आहे. सुर्जी येथे मठ स्थापनेचे वेळी दिल्लीवर मोघल सम्राटाचे राज्य होते.
हैद्राबादेत निजाम होता. म्हैसूरमध्ये हैदरअली व टिपू सुलतान होता. पुण्यात पेशवे, नागपुरात भोसले व अचलपुरात नबाबाचे राज्य होते. आपसातील कलहाचा गैरफायदा घेऊन याचवेळी इंग्रजांनी देशात पश्चिम बंगालमधून प्रवेश केला व येथील राज्यकर्त्यांसोबत तह करुन त्यांनी तैनात असलेल्या फौजेचा प्रयोग याचवेळी सुरू केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत धर्मरक्षणाचे व धर्मप्रसाराचे महाकठीण कार्य नाथपीठाने जिवंत ठेवले.
आपल्या भ्रमंतीत देवनाथ पुणे येथे दरबारी गेले असताना सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांचे स्वागत करुन पुजेत त्यांना पेशवे दरबाराचे दोन तरुण रक्षक त्यांच्या मठाच्या रक्षणासाठी दिले होते. जगू-गणू नाव असलेले हे पराक्रमी रक्षक जातीने महार होते. मठावर लुटारु दरोडेखोरांचे आक्रमण झाले असताना हे वीर मठात शहीद झाले. म्हणूनच आजही देवनाथ मठात कुळाचाराच्या नात्याने जगू-गणूच्या समाधीला पूजेचा अग्रक्रम आहे.
नाथ परंपरेतील हा मठ संपूर्ण देशभरातील भक्तांच्या भावना लाभलेला प्रसिध्द मठ असून यामुळे शहराच्या लौकिकात मोलाची भर पडली आहे.