चांदूर पालिकेची विकास कामे मार्गी लागणार
By Admin | Updated: June 27, 2015 00:11 IST2015-06-27T00:11:55+5:302015-06-27T00:11:55+5:30
या-ना त्या कारणावरुन स्थानिक नगर परिषदेतील विविध विकासकामे रखडली होती.

चांदूर पालिकेची विकास कामे मार्गी लागणार
आढावा : अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सुरेश सवळे चांदूरबाजार
या-ना त्या कारणावरुन स्थानिक नगर परिषदेतील विविध विकासकामे रखडली होती. आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना याबाबत माहिती देऊन आढावा बैठकीत निर्णय घेण्याविषयी सांगितले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पालिका सभागृहात सर्व प्रलंबित कामाचा व त्यांच्या रखडल्याच्या कारणाचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येथे कार्यरत असलेल्या बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश दिले. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
आ.बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, शरद जावळे, मुख्याधिकारी मेघना वासनकर, नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, बांधकाम सभापती सुनील गणावरे, उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन, गटनेता शे. रहेमान, मनीषा नांगलिया, भैया लंगोटे, नितीन कोरडेंसह नगरसेवक उपस्थित होते. या आढावा बैठकीत प्रलंबित रमाई आवास योजनेचे लाभार्थीही उपस्थित होेते.
रमाई घरकूल योजनेंतर्गत एकूण ११५ लाभार्थी पात्र ठरले. २० मे २०१५ रोजी प्राप्त झालेल्या ७० लक्ष अनुदानातून मालकीच्या जागेवर असलेल्या घरकूल लाभार्थ्यांना ८ लक्ष ४५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. ज्या २६ लाभार्थ्यांनी आरक्षित जमिनीवर घरकूल बांधल्याने सदर प्रस्ताव विशेष समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ लाभार्थ्यांची घरे सरकारी ज्मिनीवर असल्याने त्यांचाही प्रस्ताव समाजकल्याणकडे पाठविण्यात येत आहे. ६० लाभार्थ्यांना आतापर्यंत ५१ लाख ४५ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले.
जिल्हा वार्षिक नियोजन समितीमार्फत पालिकेला २ काटींचे कर्ज मिळाले असूून त्यास विविध कामांचाही प्रस्ताव पाठविण्यासचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अनुकंपाधारकांना नोकरीत समाविष्ट करण्यासाठी कारवाई करणारी ही पहिली बैठक ठरली.
चांदूरबाजार नगरपरिषदेची मालमत्ता कर व पाणी कराची कोट्यवधींची थकबाकी वसुलीकरिता मोहीम राबविण्याचा आदेश जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना दिला. यावेळी तालुक्यातून प्रथम आलेल्या इयत्ता १० वीचा विद्यार्थी गजानन लाडे याचा सत्कार आमदार व जिल्हाधिकारी गित्ते यांनी केला.
रमाई आवास योजनेतील २६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. ही अडचण दूर करुन ते लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची हमी आ. बच्चू कडू यांनी यावेळी दिली .