सीएमचे दूत समन्वयातून साधणार गावांचा विकास
By Admin | Updated: July 6, 2017 00:13 IST2017-07-06T00:12:30+5:302017-07-06T00:13:28+5:30
राज्य शासनाने राज्यभरातील १ हजार गावांची आदर्श ग्रामसाठी निवड केली आहे.

सीएमचे दूत समन्वयातून साधणार गावांचा विकास
२३ गावांची निवड : जिल्हा परिषदेत खाते प्रमुखांशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाने राज्यभरातील १ हजार गावांची आदर्श ग्रामसाठी निवड केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतीमधील २३ गावांचा आदर्श ग्राम म्हणून विकास केला जाणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्ह्यासाठी निवड केलेल्या १४ दूतामार्फत निवड झालेल्या गावांचा सर्वसमावेश विकास सीएम फेलो मार्फत केला जाणार आहे. उच्च शिक्षित असलेल्या १४ जणांची चमू संबंधित गावात विकास कामे, शासकीय योजनाचा लाभ, समस्या आदीेंचे बारकाईने मुल्याकंन मुक्कामी राहून ग्रामस्थांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेत आहेत. या दरम्यान गावांची गरज, उपाययोजना आदींबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासन पातळीवर स्वत: पाठपुरावा करीत आहेत. याअनुषंगाने बुधवारी ५ जुलै रोजी या चमूने जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या खातेप्रमुखांशी संवाद साधून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. सीएम फेलोचे दूत जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायती मधील २३ गावांचा समन्वयातून विकास साध्य करणे, शासकीय योजना घटकांपर्यंत पोहचत आहेत की नाही, शासकीय योजनेचे लाभार्थी योजनेच्या माध्यमातून रोजगार करीत आहेत किंवा नाही, गावात मुलभूत समस्या काय आहेत काय, त्या कशा प्रकारे सोडविता येतील यासाठी ग्रामस्तरापासून ते शासन पातळीपर्यत समन्वयातून विकास करण्याचे दृष्टिने नियोजन करीत आहे. जिल्ह्यातील निवड झालेली गावे येत्या २०१८ पर्यत आदर्श ग्राम म्हणून नावारूपास येण्यासाठी ही खास मोहीम राबविली जात आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील चार आणि धारणी तालुक्यातील नऊ अशा एकूण १३ ग्रामपंचायती मधील २३ गावांची निवड शासनाने आदर्श ग्रामसाठी जिल्ह्यातून निवडली आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द, शेंदोळा बु, जावरा आणि शिरजगांव मोझरी या चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. धारणी मधील सलई, टेंभली, खाऱ्या टेब्रु, टिंगऱ्या, झापल, मालूर, चौराकुंड या ग्रामपंचायतीचा समावेश असून या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश आहे.