सर्वांच्या सहकार्याने विकास करु

By Admin | Updated: December 27, 2014 22:43 IST2014-12-27T22:43:25+5:302014-12-27T22:43:25+5:30

आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आता पालकमंत्रीही झालो त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्वीकारून सगळ्यांना सोबत घेत विकास कामे करणार, अशी ग्वाही राज्याचे उद्योग,

Develop with the help of everyone | सर्वांच्या सहकार्याने विकास करु

सर्वांच्या सहकार्याने विकास करु

महापालिकेत सत्कार : प्रवीण पोटे यांची ग्वाही
अमरावती : आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आता पालकमंत्रीही झालो त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्वीकारून सगळ्यांना सोबत घेत विकास कामे करणार, अशी ग्वाही राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.
महापालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर चरणजित कौर नंदा तर सत्कारमूर्ती राज्याचे नगरविकास, गृह, संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे मंचावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आयुक्त अरूण डोंगरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, अमरावती जिल्ह्यात मंत्रिपदाचा बॅकलॉग नाही. माझ्या सोबतीला नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील आहेत. महापालिकेच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने पाटील यांनी अकोल्यात लक्ष देत असताना अमरावतीकडेही जास्त लक्ष द्यावे, अशी गळ घालणार, असे पोटे म्हणाले. आमदार सुनील देशमुख हे पालकमंत्री, राज्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या विकासकामांपेक्षा चांगले काम करून शहराचा चेहरामोहरा बदलविणार, असे पोटे यांनी आवर्जून सांगितले. महापालिकेत नगरसेवकांना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे त्याकरिता आयुक्तांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. काही वर्षांपासून ठराविक कंत्राटदारालाच महापालिकेत कामे मिळत असल्याची ओरड आहे. ती थांबवून कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. बाहेरील व्यक्तीला कंत्राट देता कामा नये. अमरावतीला स्मार्ट सीटी बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार, असे आश्वासन देत सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासकामे करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिजन असून विदर्भ विकासाच्या बाबतीत जबरदस्त चमकेल असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडे बालहट्ट धरेल
महापालिकेत आता अनुदान किंवा योजना आणायच्या असेल तर अटी-शर्तीच्या अधीन राहून मिळेल. महापालिकेत अनेक समस्या आहेत. प्रस्ताव पाठवा त्याचा सकारात्मक विचार होईल. या समस्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे बालहट्ट धरणार, असे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले. शहरालगतच्या छोट्या गावखेड्यांचा ताण महापालिकांवर येत आहे. त्यामुळे अशा गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायत नियोजन प्राधिकरण मंजूर करण्यात आले आहे. या गावांचा विकास गाव शिवार ते जिल्हाधिकारी असा चालणार आहे. महापालिकेचा कारभार चालविण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागेल, नागरिकांना मूलभूत सुविधा देताना उत्पन्नाचे साधने वाढवावे लागतील, असे ते म्हणाले. प्रास्ताविक आयुक्त अरूण डोंगरे, संचालन ज्योती तोटेवार, आभार प्रदर्शन मदन तांबेकर यांनी केले. सत्काराला मिलिंद बांबल, बबलू शेखावत, विलास इंगोले, तुषार भारतीय, दिगंबर डहाके, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, सुनील काळे, अजय गोंडाणे, विनायक औगड, चंदन पाटील, राजू मानकर, तमिजाबी, कांचन ग्रेसपुंजे, चेतन पवार, सुगनचंद गुप्ता, प्रल्हाद कोतवाल, विजय नागपुरे, नुरखाँ, छाया अंबाडकर, रेखा तायवाडे, प्रवीण हरमकर, बंडू हिवसे, राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे, मंजुषा जाधव, निर्मला बोरकर, गुंफाबाई मेश्राम, सुजाता झाडे, नंदकिशोर वऱ्हाडे, प्रवीण मेश्राम, अंबादास जावरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Develop with the help of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.