मानवी अवयव तस्करीच्या शंकेचाही करा तपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 23:52 IST2016-08-26T23:52:26+5:302016-08-26T23:52:26+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात 'किडनी रॅकेट' सक्रिय असल्याचा खळबळजनक...

Detects the suspicion of human organs smuggling! | मानवी अवयव तस्करीच्या शंकेचाही करा तपास !

मानवी अवयव तस्करीच्या शंकेचाही करा तपास !

आश्रमात दोनदा झाला दगा : गळा कापला, चेहरा ठेचला- किडनी रॅकेट अशक्य कसे ? 
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात 'किडनी रॅकेट' सक्रिय असल्याचा खळबळजनक आणि तितकाच गंभीर खुलासा माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी चांदूररेल्वे येथील जाहीर सभेत अलीकडेच केला. चांदूररेल्वेवासीयांनी शहर कडकडीत बंद ठेवून अजय वणवे आणि प्रथमेश सगणे यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या ज्या लढ्याला हृदयातून साथ दिली, त्या लढ्याला संबोधित करताना ढोले यांनी हे रहस्योद्गार काढल्याने पोलिसांना ही शक्यता मुळीच दुर्लक्षित करता येणार नाही.
शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या हद्दीत कुण्या गोंडस, निष्पाप मुलाचा गळा निर्घृणपणे चिरला जाईल, कुण्या निरागस मुलाचा चेहरा नि डोके दगडाने ठेचले जाईल, असा विचारही कधी कुणी केला नव्हता. अजय वणवे याचा चेहरा ठेचल्यानंतरही आश्रमातून त्याच्या आईला तो स्वच्छतागृहात पडल्याची जी नियोजित खोटी माहिती देण्यात आली, त्यावरही त्याच्या आईने निष्ठेने विश्वास ठेवला. अजयचा चेहरा कुणी दगडाने ठेचला असावा, अशी शंकाही त्या माऊलीच्या मनात अजयच्या भेटीनंतरही उत्पन्न झाली नाही, आश्रमावर त्यांचा इतका गाढा विश्वास होता.
प्रथमेश सगणे हा बांधकाम सुरू असताना वरच्या माळ्यावरून कोसळला आणि त्यामुळे त्याचा गळा कापला गेला, अशी नियोजित खोटी माहिती आश्रमातील मंडळींनी प्रथमेशच्या वडिलांना दिली होती. त्यांनाही पहिल्यांदा त्या माहितीवर विश्वास बसला होता. प्रथमेशचा नरबळीच्या उद्देशाने कुणी गळा कापला असावा, अशी शंंकाही वडिलांच्या मनाला स्पर्शून गेली नव्हती. आश्रमावरील त्यांचाही विश्वास असा दृढ होता. परंतु आश्रमात जो दगा झाला, तो अकल्पित आहे. या दोन्ही चिमुकल्यांच्या पालकांसाठी त्यामुळे जणू विश्वच पोरके झाले आहे. ज्या आश्रमात विश्वशांतीची संकल्पना सांगितली जाते, ज्या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष खुद्द शंकर महाराज हे आहेत, तेथेच मातेची कूस उजाडण्याचे पातक घडत असेल, निरागसांचे बळी देण्याचे असुरी प्रयत्न होत असतील तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा प्रश्न दोन्ही मातांना वारंवार अश्रुधारांनी चिंब करुन जातो. ज्याचा विचारही करू शकत नाही, असे आक्रीत शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात घडले आहे. प्रकरण उच्चस्तरावर पोहोचले असल्याने नरबळी या मुद्याभोवती पोलीस बारीक तपास करीत आहेत; तथापि पोलिसांना आता त्यांच्या तपासाची दिशा दुधारी करावी लागणार आहे. पांडुरंग ढोले यांनी अंगुलीनिर्देश केलेले रहस्य उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांना कसोशीने करावा लागणार आहे.
आश्रमात किडनी रॅकेट असूच शकत नाही, असा विचार आता नरबळीच्या गुन्ह््यांनतर कुणालाच करता येणार नाही. ना पोलिसांना, ना समाजाच्या सजग प्रहरींना! पांडुरंग ढोले हे जबाबदार व्यक्ती आहेत. कायदे तयार केले जातात त्या सभागृहाचे त्यांनी सदस्यत्व भूषविले आहे. चांदूरबाजारच्या नागरिकांचा आक्रोष ज्या आंदोलनातून उमटला त्या मोर्चाचे नेतृत्त्व ढोले यांच्याकडे सोपविण्यात आले होते. अर्थात् अजय आणि प्रथमेश यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांच्या लढ्याचेच ते जबाबदार प्रमुख या नात्याने बोलत होते. मोर्चात सहभागी असलेल्या चांदूररेल्वेवासीयांसमोर त्यांनी आश्रमात मानवी अवयवांची तस्करी करणारे रॅकेट कार्यरत असल्याची शंका अधिकृतपणे जाहीर केली. ढोले यांनी ज्या प्रसंगात, ज्या अनुषंगाने आणि ज्या जबाबदारीने हे वक्तव्य केले, त्याचे महत्त्व लक्षात घेता पोलिसांना या दिशेने तपास करावाच लागेल.
नरबळीचे गुन्हे आश्रमाच्या परिसरात घडले आहेत. त्यासंबंधिचे प्राथमिक आरोपी अटकेत आहेत. चिंतनाचा विषय असा की, लहान मुलगाही या गुन्ह््यात आरोपी आहे. नरबळीसाठी निवडण्यात आलेले देह हे किडनी काढण्यासाठी जे देह आवश्यक असतात त्यासाठी पूरक असलेल्या वयातील आहेत. नरबळी दिल्यानंतर सर्व सोपस्कार पार पडल्यावर निरुपयोगी शरीरातील किडनी काढली जाणार नाही, याची काय शाश्वती? जेथे जिवंत मुलगा कापला जातो, तेथे त्या मुलाची किडनी काढणे काय कठीण? आश्रम ज्या भूभागात आहे, त्या प्रदेशात अनेक वर्षे राजकीय, सामाजिक आयुष्य जगत असताना ढोले यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळेच ते पोलिसांसाठी दिशादर्शक आहेत.

Web Title: Detects the suspicion of human organs smuggling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.