लाखभर एकरातील तूर पीक नष्ट

By Admin | Updated: July 29, 2016 23:57 IST2016-07-29T23:57:35+5:302016-07-29T23:57:35+5:30

महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील किमान एक लाख एकरमधील तुरीचे पीक पिवळे पडून जळाले आहे.

Destruction of tur pea in millions of acres | लाखभर एकरातील तूर पीक नष्ट

लाखभर एकरातील तूर पीक नष्ट

भीषण संकट : अतिपावसाचा परिणाम, मर रोगाचे थैमान, व्यवस्थापनाची गरज 
गजानन मोहोड  अमरावती
महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील किमान एक लाख एकरमधील तुरीचे पीक पिवळे पडून जळाले आहे. शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे ठाकले असताना कृषी विभागाचे कुठलेच नियोजन नाही. मग, हा विभाग कोणत्या कामाचा, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
तुरीचे पीक हे संवेदनशील आहे. सतत पाऊस झाल्यास किंवा शेतात पाणी साचल्यास तुरीचे उभे पीक पिवळे पडून कोमेजून जाते. पेरणीनंतर तुरीच्या पिकाची पहिली ३० दिवस वाढ ही मंदगतीने होते. नंतर मात्र ही वाढ झपाट्याने होते. नेमका याच काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सरासरीच्या १५८.३ टक्के पाऊस व झडसदृश स्थिती व अतिवृष्टिमुळे बहुतांश शेतांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीत तर तुरीची अवस्था अत्यंत विदारक आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ तुरीचे पीक पाण्यात उभे राहिल्यास पिकांची मुळे सडू लागतात व पाने पिवळी पडतात. यामुळे तुरीचे झाड जागेवरच मृतप्राय होते. यालाच ‘मर’ देखील म्हणतात. यासाठी शेतातील पाणी बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थापन करण्याकरिता उसंत मिळालेली नाही. त्यामुळे सरासरी क्षेत्राच्या २५ ते ३० टक्के भागातील तूरपीक धोक्यात आले आहे. पावसाने उघाड दिल्यास तुरीचे उर्वरित पीक शेतकऱ्यांच्या हाती येईल.

जिल्ह्यात १ लाख ३१ हजार हेक्टरमध्ये तुरीची पेरणी
अमरावती : तूर जागीच जळाल्याचा प्रकार अत्याधिक पाऊस व काळी जमीन असणाऱ्या दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, तिवसा, अंजनगांव सुर्जी, या तालुक्यात अधिक दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ३१ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. यामध्ये अंजनगांव ६७६७ हेक्टर, अचलपूर १०,३१७, चांदूरबाजार ११,६७०, धामणगांव ९४२२, चांदूररेल्वे ७१०७, तिवसा ५४९५, मोर्शी १३,८१८, वरुड ११,४९३, दर्यापूर ११,८७१, धारणी १०,४३०, चिखलदरा २२९३, अमरावती १०,२९०, भातकुली १०,२८० व नांदगांव खंडेश्वर तालुक्यात १०,४०८ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे.

‘मर’ म्हणजे काय?
शेतात पाणी साचून राहण्याचा कालावधी, पिकाची विकास अवस्था, जमिनीची संप्रुक्तता, तापमानातील बदल व पाण्याचा निचरा हे घटक तूर पिकावर परिणाम करतात. शेतात २ दिवसपर्यंत पाणी साचून रााहिल्यास जमिनीतील आॅक्सीजनचे प्रमाण टिकून राहते. नंतर जमीन पाण्याने ओतप्रोत भरते.याला जमीन ‘संप्रुक्त’ झाली असे म्हणतात. जमिनीतील आॅक्सीजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढते व तूर पीक बाधित होते. जमिनीत हवा खेळती न राहिल्याने मुळांना श्वासोच्छवास घेण्यास अडसर निर्माण होतो. परिणामी ‘मर’ रोगची लागण होते. जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांचे प्रमाणही वाढते.

अशा
करा उपाययोजना
सर्वप्रथम चर खोदून शेतातील पाणी बाहेर काढावे. वाफसा आल्यानंतर लगेच डवरणी करावी, ज्यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते. आवश्यकतेनुसार नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा, मर झालेल्या भागात पुन्हा लागवड करायची असल्यास बियाण्यास कर्बोक्षिन + थायरम (मिश्र घटक) ३ ग्राम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी, अर्ध रब्बी हंगामात तुरीची १५ सप्टेंबरपर्यंत पेरणी आटोेपावी.

पर्याय : तीळ आणि सूर्यफूल
एखाद्या शेतात आंतरपीक म्हणून तूर जर अतिपावसाने जळाल्यास अन्य पीक घेता येत नाही. मात्र, ज्या शेतात फक्त तुरीची पेरणी करण्यात आली आहे, अशा शेतातील तूर जळाल्यास तीळ व सूर्यफूलाचे पीक पर्यायी पीक म्हणून घेता येत असल्याची माहिती कृषीतज्ज्ञांनी दिली.

कृषीविभागाला केव्हा येणार जाग?
जिल्ह्यातील १ लाखांपेक्षा अधिक हेक्टर शेतीतील तूर अतिपावसाने जागीच जळाली असताना अद्याप कृषीविभागाद्वारा पाहणी, सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आलेला नाही. किंबहुना शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करण्याची तसदी देखील कृषी अधिकाऱ्यांनी घेतली नाही. शेतकऱ्यांवर नवे संकट उद्भवले असताना शासनाला याचा रिपोर्ट कृषी विभागाने पाठविला नसल्याची माहिती आहे. वहाणांना माती लागणार नाही, याची दक्षता घेणाऱ्या या कृषी विभागाला केव्हा जाग येणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे तूर पिकांवर ‘मर’ स्थिती उद्भवली आहे. शेतात चर खोदून पाणी बाहेर काढणे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.
- योगेश इंगळे, कृषी शास्त्रज्ञ

Web Title: Destruction of tur pea in millions of acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.