प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीसमोर डेरा
By Admin | Updated: November 10, 2014 22:36 IST2014-11-10T22:36:50+5:302014-11-10T22:36:50+5:30
नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीसमोर डेरा
अमरावती : नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यावेळी अल्पसा मोबदला देऊन या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेतजमीन प्रकल्पात गेल्यानंतर त्यांना उपजिविकेचे इतर कोणतेही साधन नसून दिलेल्या तोकड्या रक्कमेत सध्याच्या महागाईच्या काळात जमीन घेणे अशक्य होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी केली आहे. मागणी मंजूर न झाल्यास हे शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. कलम २८ (अ) अंतर्गत २९६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली होती. मात्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २५० प्रकरणांचाच समावेश केला.
मात्र उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना न्याय दिला नसल्याने अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यांना रोजगार द्या अन्यथा शेतीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
उपोषण कर्त्यांमध्ये प्रवीण मनोहर, म. शकील म. नजीर, शे. इसमाईल शे. इसराईल, शे. दिवान शे. बुट्टू, रामकृष्ण पारवे, सुखदेवराव मेश्राम, पांडुरंग धनसुईकर, वासुदेव लव्हाळे, नारायण टाके, अ.बशीर शे. बट्टू, राजू पांडे, मारोतराव धंदेर, गणेश पांडे, माणिकराव विरुळकर व अन्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे.