माधान येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

By Admin | Updated: June 30, 2015 00:28 IST2015-06-30T00:28:26+5:302015-06-30T00:28:26+5:30

तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या...

Depleting the drain from the people's participation in the farm | माधान येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

माधान येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

नवा आदर्श : ६० हजार रूपयांची लोकवर्गणी जमा
चांदूरबाजार : तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या मध्यातील नाल्याचे खोलीकरण केले. यासाठी लागणारा निधी गावातील लोकांनी लोकवर्गणीतून जमा केला. हा एक नवा आदर्श तालुक्यात दिशादर्शक ठरणारा आहे. माधानवासीयांचा हा आदर्श तालुक्यातील सर्वच नागरिकांनी घेतला तर जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
संत श्री गुलाबराव महाराजांनी आपले शेतीविषयक विचार मांडताना येणाऱ्या काळात कोणता शेतकरी टिकेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता थोड्याफार पाण्याची व्यवस्था करून जो आपली शेती पिकवेल तोच शेतकरी भविष्यात शेतीत टिकवेल. महाराजांच्या याच वचनातून प्रेरणा घेऊन माधान येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाचे नाला खोलीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. तसेच या गावाला गांधीवादी विचारसरणीच्या सेवाभावी ताराबेन मश्रुवाला यांच्या जनसेवेचा वारसाही लाभला आहे. या मातीत रुजलेल्या त्यांच्या लोकसेवा वारसाचाही गावकऱ्यांनी यासाठी उपयोग करून घेतला.
गावकऱ्यांच्या या भावना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्यानंतर स्वत: ग्रामपंचायत कार्यालयही या लोकसहभागात समाविष्ट झाले. लोकांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ग्रामपंचायत रीतसर सात नंबरची पावतीही दानदात्याला देण्यात येऊन या कामावरील जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर सोपविली आहे, अशा रीतीने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन नाला खोलीकरणाच्या निमित्ताने जलशिवार योजनेचा अभिनव शुभारंभ शासनाची कोणतीही मदत न घेता सुरू करून एक आदर्श तालुक्यातील नागरिकांना घालून दिला.
गावकऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला स्थानिक उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन केले.
सदर उपक्रम राबविण्याकरिता उपसरपंच दिनेश देशमुख, कस्तुरबा माधान संस्थेचे सचिव बाळासाहेब पटवर्धन, सरपंच अश्विनी धावडे, बाळासाहेब पाटेकर, विजय रेवळकर, रवी सर्वटकर, मोहन धावडे, एस. एम. मोहोड, रावसाहेब भागवत, कृष्णराव कोल्हे, अनिरुद्ध मोहोड यांनी पुढाकार घेतला. या नाला खोलीकरणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ६० हजार रुपये एवढा निधी लोकवर्गणीतून जमा केला, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)

जलयुक्त शिवार अभियानाला प्रतिसाद
शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला येथे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथील नागरिकांची सहकार्याची भावना असून जलयुक्त शिवार योजना त्यांच्या मदतीने १०० टक्के यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Depleting the drain from the people's participation in the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.