डेंग्यू आता ‘नोटीफाईड’ आजार
By Admin | Updated: July 4, 2016 00:02 IST2016-07-04T00:02:16+5:302016-07-04T00:02:16+5:30
पावसाळयाच्या दिवसांत उद्भवणाऱ्या डेंग्यू रोगाच्या अधिसूचित आजारांच्या नोंदणी यादीत केला आहे.

डेंग्यू आता ‘नोटीफाईड’ आजार
शासनाची सूचना : शासकीय, खासगी रूग्णालयांत अंमलबजावणी
अमरावती : पावसाळयाच्या दिवसांत उद्भवणाऱ्या डेंग्यू रोगाच्या अधिसूचित आजारांच्या नोंदणी यादीत केला आहे. यापुढे सरकारी रूग्णालयासह खासगी डॉक्टरांनी डेंग्यू रूग्णांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने २ जुलै रोजी आदेश जारी केले आहेत.
सन २०१२ मध्ये जिल्ह्यासह सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली होती. आतापर्यंत या आजाराबाबत तीन हजारांवर रूग्णांच्या नोंदी आरोग्य विभागाकडे आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रूग्णांचा अधिसूचित आजारांच्या नोटीफाईड यादीत समावेश करण्याची मागणी पुढे आली होती. हेल्प मुंबई फाऊंडेशन तर्फे यासाठी जनहित याचिका दखल केली होती. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचे निधन डेंग्यूमुळे झाल्याचे निष्पन्न होताच खळबळ उडाली होती. राज्यभरात तातडीने डेंग्यू रूग्णांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले होते. सरकारी आरोग्य यंत्रणेने डेंग्यूच्या नोंदी घेतल्या होत्या. मात्र, खासगी रूग्णालयांवर यासंदर्भात कोणतीही बंधने नव्हती. परंतु केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटंूब कल्याण मंत्रालयाने ९ जून रोजी डेंग्यूचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश जारी केले. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवा, महापालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही डेंग्यू रूग्णांची नोंद घ्यावी लागणार आहे. रूग्णांची आकडेवारी महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाकडे तर ग्रामिण भागात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे डेंग्यू रूग्णांची नोंद करावी लागेल.
रूग्णांचा आकडा कळेल
डेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत केल्याने या आजाराचा निश्चित आकडा कळू शकेल. यासोबतच औषध विक्रेत्यांपासून खासगी रूग्णालये, डॉक्टर आदींना सगळयांना डेंग्यू रूग्णांची आकडेवारी तसेच तपशीलवार माहिती नगरपालिका, महापालिका व माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने १ ते ३१ जुलैपर्यंत डेंग्यू आजाराबाबत जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. डेंग्यूचा अधिसुचित आजारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना डेंग्यू रूग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. यापूर्वी 'नोटीफाईड' आजारामध्ये कॉलरा, प्लेग या आजारांनंतर आता डेंग्यूचा समावेश केला आहे.तसे आदेश मिळाले आहेत.
- सुरेश तरोडेकर,
जिल्हा हिवताप अधिकारी, अमरावती