चांदुर रेल्वे शहराला डेंग्यूचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:24+5:302021-07-08T04:10:24+5:30
पत्रीकर कॉलनी, इंदिरानगर हॉटस्पॉट, प्रशासन सुसज्ज चांदूर रेल्वे : ठिकठिकाणी साचलेले पाणी, तुंबलेल्या नाल्या, डबकी, घराघरांत अडगळीत असलेले पावसाचे ...

चांदुर रेल्वे शहराला डेंग्यूचा डंख
पत्रीकर कॉलनी, इंदिरानगर हॉटस्पॉट, प्रशासन सुसज्ज
चांदूर रेल्वे : ठिकठिकाणी साचलेले पाणी, तुंबलेल्या नाल्या, डबकी, घराघरांत अडगळीत असलेले पावसाचे पाणी आणि त्यावर वाढणारे डास यामुळे कोरोनाच्या संकटानंतर आता शहरात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे. पंधरा दिवसांत शहरात अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याचे विविध रुग्णालयांच्या अहवालावरून दिसून येत आहे.
गत आठवड्यात सतत सुरू असलेली पावसाची उघडझाप, वातावरणातील दमटपणा, डासांचा वाढता प्रकोप यामुळे तालुक्यात रोगराईत वाढ झाली आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांतील आणि प्रयोगशाळांमधील माहिती घेतली असता, डेंग्यूचे रुग्ण संपूर्ण तालुक्यात आढळून आले आहे. शहरात आतापर्यंत ४० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण रुग्णालयात गर्दी
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्दी, खोकला व विषाणूजन्य आजारासोबतच रुग्णात पांढऱ्या व तांबड्या रक्तपेशी कमी होत आहेत. येथे डेंग्यूचे निदान करण्याची व्यवस्था नसल्याने रुग्ण लगेच ओळखता येत नाही. परंतु, रक्तातील पेशी कमी होणे हे प्राथमिक लक्षण असल्याचे मत येथील डॉक्टर मरसकोल्हे यांनी सांगितले.
इंदिरानगरात रुग्ण
रुग्णाचा ताप एक आठवड्यापेक्षा जास्त राहिल्यास अमरावती किंवा इतर खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. त्यामुळे तालुक्यात किती लोकांना डेंग्यूची लागण झाली, हे ओळखणे शक्य नसल्याचेही ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. शहरातील डॉ. सागर वाघ यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत तालुक्यातील अनेक गावांसह शहरातील इंदिरानगर आणि पत्रीकर कॉलनी परिसरात डेंग्यूचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे समजते.
---------------------
नाल्या करा वाहत्या ग्रामीण रुग्णालयात या आजाराचे रक्त तपासण्याची सोय नसल्याने संशयित रुग्णांचे रक्तनमुने पुणे येथे पाठविले जातात. तालुक्यातील डेंग्यूचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावरून चमू आली होती. यानंतर शहरातील नाल्या वाहत्या करण्यासाठी नगर परिषदेला कळविल्याचे डॉ. मरसकोल्हे यांनी सांगितले.
--------------------