जिल्ह्यातील ९३ मुख्याध्यापकांचे ‘डिमोशन’
By Admin | Updated: December 19, 2015 00:11 IST2015-12-19T00:00:57+5:302015-12-19T00:11:10+5:30
जिल्ह्यातील ६०८ शिक्षकांसह ९३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. यामुळे समायोजनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

जिल्ह्यातील ९३ मुख्याध्यापकांचे ‘डिमोशन’
मराठीसह उर्दू शाळांचा समावेश : सहायक किंवा पदवीधर शिक्षक म्हणून देणार सेवा
अमरावती : जिल्ह्यातील ६०८ शिक्षकांसह ९३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. यामुळे समायोजनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. शिक्षकांवर समायोजनाची टांगती तलवार असताना मुख्याध्यापकांना संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. यात मराठी माध्यमाच्या ७६ आणि उर्दू माध्यमाच्या १७ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. या ९३ मुख्याध्यापकांना समायोजनास अपात्र ठरविल्याने ही प्रक्रियाच आता न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी आणि उर्दू माध्यमातील प्राथमिक शिक्षण विभागातील ९३ मुख्याध्यापक समायोजनास अपात्र ठरल्याने त्यांना अन्य शाळांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सहायक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक म्हणून रुजू व्हावे लागणार आहे.
आरटीई २००९ नुसार सन २०१५-१६ च्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर व कार्यरत पदांच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ पंचायत समितींमध्ये आरटीई २००९ नुसार मुख्याध्यापकांची २०४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्या तुलनेत २८० मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातील ७६ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने ते समायोजनासाठी अपात्र ठरले आहेत तर उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये १७ मुख्याध्यापक समायोजनासाठी अपात्र अर्थात पदावनत ठरले आहेत. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत या ९३ जणांना आता सहायक शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. त्यामुळे या मुख्याध्यापकांमध्ये प्रचंड असंतोष धूमसत आहे.
मुख्याध्यापकांसह जिल्ह्यातील ३०८ शाळांमधील सुमारे ६०८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभरातील शाळांना लवकरच टाळे लागण्याचे सूतोवाच झाल्याने जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. अद्याप त्यासंदर्भात आदेश आला नसला तरी जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती शासनाने मागितल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनीसुध्दा सांगितले आहेत. (प्रतिनिधी)