गणपती विसर्जन मिरवणुकीत तलवार, त्रिशूलचे प्रदर्शन भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:21 IST2018-09-25T22:20:53+5:302018-09-25T22:21:56+5:30
नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत निघालेल्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी हाती तलवारी व त्रिशूल घेऊन प्रदर्शन केल्याने सोमवारी रात्री प्रचंड खळबळ उडाली. मंडळ कार्यकर्त्यांचा हा प्रताप चर्चेचा विषय बनला होता.

गणपती विसर्जन मिरवणुकीत तलवार, त्रिशूलचे प्रदर्शन भोवले
अमरावती : नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत निघालेल्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी हाती तलवारी व त्रिशूल घेऊन प्रदर्शन केल्याने सोमवारी रात्री प्रचंड खळबळ उडाली. मंडळ कार्यकर्त्यांचा हा प्रताप चर्चेचा विषय बनला होता.
नांदगावपेठ पोलिसांनी या प्रकरणात १७ जणांना अटक केली, त्यांच्याजवळील दोन तलवारी, चार हत्यार जप्त केली. तलवारबाजीनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. नांदगावपेठ येथे बजरंग दलाचे विदर्भ संयोजक संतोष गहरवाल यांच्या नेत्तृत्वात बाल दीपक गणेश मंडळाची मिरवणूक सोमवारी सायंकाळी ७ वाजता निघाली.
दीडशे जणांविरुद्ध गुन्हे
ग्रामपंचायत चौकात गणेश मंडळाने महाआरतीनंतर बन्नेखा चौकापर्यंत मंडळातील पदाधिकाऱ्यांनी तलवारींचे प्रदर्शन सुरू केले. ते नाईकवाडी मशिदीपर्यंत अव्याहत सुरू होते. मिरवणूक मध्यरात्री विसर्जनस्थळी पोहोचली. दरम्यान, तलवारीसोबत भाले उंचावले गेले आणि चिथावणीखोर गाणी वाजविल्याने विशेष समुदायात रोष व्यक्त झाला. यावेळी मोठा समुदाय गोळा झाला होता. परंतु, पोलिसांनी तणावाची स्थिती हाताळून शांत केली. तथापि, जोपर्यंत संतोष गहरवाल आणि त्याच्या कार्यकर्त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत परिसरात बसण्याचा आग्रह विशेष समुदायाने केला. अखेर नांदगावपेठ पोलिसांनी सुमारे दीडशे कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १५३ (३), ४/२५ आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३४, १३५, पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५, १९ व ध्वनिप्रदूषण प्रतिबंध कायदा कलम १५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मध्यरात्रीच आरोपींची धरपकड सुरू केली. यामध्ये संतोष गहरवाल, सचिन नरसिंगकार, नितीन नरसिंगकार, अंकुश चौधरी, वैभव कोळसकर, अंकुश बाणासुरे, रूपेश पोटफोडे, प्रवीण शेंदरकर, प्रफुल्ल बाणासुरे, राहुल मारबते, सुमित काकाणी, नरेंद्र गवई, सूरज राठोर, महेंद्र कोठार, गजानन इंगळे, जगदीश बंड, ऋषीकेश तायडे यांना अटक केली. याशिवाय आणखी काही कार्यकर्ते पसार आहेत. निरंजन दुबे, राहुल पंचबुद्धे, मारोती ससाने, जगदीश बंड, दिलीप नागापुरे, रोशन बोकडे, दीपक नागापुरे, मंगल भगत, नंदू बैराळे आदी आरोपींचा शोध नांदगावपेठ पोलीस घेत आहेत.
पोलीस आयुक्तांनी काढली रात्र जागून
नांदगावपेठ हद्दीतील तणावाची स्थिती पाहता, दोन पोलीस उपायुक्त, दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता. दीडशे जणांचा ताफा स्थितीवर लक्ष ठेवून आहे. आरोपींची धरपकड सुरू असताना नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर १७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना सीपी संजयकुमार बाविस्कर यांच्यासमक्ष हजर केले. सीपी हे मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयातच उपस्थित होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.